Pune - PCMC Tendernama
पुणे

पुण्यात PMRDAकडून म्हाळुंगे-माण पाठोपाठ 'या' भागासाठी टीपी स्कीम

टेंडरनामा ब्युरो

आपुणे (Pune) : म्हाळुंगे-माण पाठोपाठ सुमारे १३० हेक्टर जागेवरील औताडे-हंडेवाडीतील नगर रचना योजना (टीपी स्किम) पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) (PMRDA) राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. याशिवाय डिसेंबरअखेर मांजरी, ओव्हाळवाडी या आणखी दोन नगर रचनांची सर्व प्रक्रिया पूर्ण करून मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत पुढील वर्षी चार नगर रचना योजनेंची कामे सुरू होण्याची शक्यता आहे. औताडे-हंडेवाडी येथील नगर रचना योजनेची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ती योजना मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार त्यास दोन महिन्यात मान्यता देण्याचे बंधन आहे. त्यामुळे या योजनेस जानेवारी अखेरपर्यंत मान्यता मिळाल्यानंतर तीची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.

म्हाळुंगे माणनंतर औताडे-हंडेवाडी नगर रचना योजनेचे प्रारूप यापूर्वीच प्राधिकरणाने जाहीर केले होते. मात्र, या योजेनेला कोरोना महामारीचा फटका बसल्याने काम थांबले होते. दरम्यान ऑगस्टमध्ये या योजनेवर सुनावणीसाठी राज्य सरकारने लवादाची नेमणूक केली होती. सुमारे ७००हून अधिक खातेदारांची सुनावणी लवादामार्फत पूर्ण झाल्यानंतर ही योजना अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. तर मांजरी-वाल्हेकरवाडी आणि ओेव्हाळवाडी- पाच या दोन्ही नगर रचना योजनेचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत लवादामार्फत सुनावणीचे काम पूर्ण झाल्यावर दोन्ही योजनाही राज्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल.

चार ते पाच टीपी स्किम पालिकेच्या ताब्यात

पीएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात २७ नगर नियोजन योजना प्रस्तावित केल्या आहेत. तर प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्यासाठी यापूर्वीच ११ टीपी स्किम प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. म्हाळुंगे माण, औताडे -हंडेवाडी, मांजरी-वाल्हेकरवाडी आणि ओव्हाळवाडी या टीपी स्किमचा त्यात समावेश आहे. या योजनेची कामे सुरू असतानाच पीएमआरडीएच्या हद्दीतील ३४ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाली. त्यामुळे या गावांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या चार ते पाच टीपी स्किम महापालिकेच्या ताब्यात गेल्या. त्यापैकी एका टीपी स्किमला महापालिकेकडून नुकतीच मान्यता मिळाली. तर दुसऱ्या टीपी स्किमवर अंतिम मान्यतेच्या टप्प्यात आले.

ग्रोथ सेंटर प्रस्तावित

प्रारूप विकास आराखड्यात पीएमआरडीएकडून ग्रोथ सेंटर प्रस्तावित आहे. या ग्रोथ सेंटरच्या परिसरात या २७ टीपी स्किम प्रस्तावित केल्या आहेत. आराखड्यावरील हरकती-सूचनांची सुनावणीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. जानेवारीपर्यंत हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाण्याची शक्यता आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर या प्रस्तावित करण्यात आलेल्या टीपी स्किम राबविण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

१३० हेक्टरवर प्रस्तावित करण्यात आलेल्या औताडे-हंडेवाडी येथील नगर रचना योजनेवरील लवादाचे काम पूर्ण करून ती अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर करण्यात आली आहे. तर डिसेंबरअखेर आणखी दोन नगर रचना योजना राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए