पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका हद्दीतील १.३ किलोमीटरचा स्पाइन रोड ते निगडी प्रादेशिक रस्त्याचे काम पीएमआरडीएकडून (PMRDA) हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी नवीन मार्ग निर्माण होणार आहे. या रस्त्यासाठी ३५ कोटी खर्च येणार असून, हिंजवडीला जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता होऊ शकतो. तसेच शहरातील वाहतूक बाहेरील मार्गे वळविण्यास मदत होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील सोलू व वाघोली रस्त्यामुळे पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे ते नगर रस्ता जोडला जाईल. त्यामुळे, शहरांतर्गत वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, सोलू ते वडगाव शिंदे हा रिंगरोडचा भाग जो पुणे महापालिका हद्दीपर्यंत आहे. तो, प्राधिकरणामार्फत विकसित करण्यात येणार आहे. तर, पुणे महापालिका हद्दीतील लोहगाव ते वाघोली- वडगाव शिंदे हा रिंगरोडचा भाग ५.७० किलोमीटर पुणे महापालिका विकसित करणार आहे. त्यामुळे, प्राधिकरण हद्दीतील रिंगरोडचा उर्वरित भाग (६५० मीटर लांबी) ६५ मीटर रुंदीने व प्रादेशिक योजनेमधील ६५० मीटर लांबीचा ९० मीटर रुंद असा १.३ किलोमीटरचा रस्ता हा प्राधिकरणामार्फत विकसित करण्यात येणार आहे.
हा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून स्पाईन रोडद्वारे, पठारे चौक चऱ्होली हद्दीतून पुढे निगडी येथे जुन्या पुणे-मुंबई रस्त्यास जोडला जाऊन वाहतुकीची नवीन लिंक निर्माण होणार आहे. तसेच, हा रस्ता भविष्यात हिंजवडीला जाणारा पर्यायी रस्ता वाघोली-लोहगाव- आळंदी- मोशी-निगडी- पुनावळे- हिंजवडी असा नवीन मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे, या रस्त्याचे काम झाल्यास ९० मीटर रुंदीचा रस्ता पुणे-नगर रस्त्यास जोडला जाऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सद्यःस्थितीत पिंपरी महापालिका हद्दीतील आरपी रस्त्याचे मोशी, पांजरपोळ चौक ते चऱ्होलीपर्यंत एकूण ९.५० किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याचे काम ३० मीटर रुंदीने पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सुरु आहे. सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. याच धर्तीवर प्राधिकरणाकडील ६५० मीटर रस्त्याची लांबी ३० मीटर रुंदीने विकसित करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘‘स्पाइन रोड ते निगडी जुना मुंबई-पुणे रस्ता जोडला गेल्यानंतर नगर मार्गे येणारी वाहतूक वाघोलीतून आळंदी रोडमार्गे, नाशिक रोडला क्रॉस करून मुंबईकडे भक्ती-शक्ती मार्गे निघण्यास मदत होणार आहे. बाहेर पडणाऱ्या वाहनांना शहरातून येण्याची गरज उरणार नाही. हिंजवडीत होणाऱ्या कोंडीलाही त्यामुळे फरक पडेल.
- अशोक भालकर, मुख्य अभियंता, पीएमआरडीए