PMPML Tendernama
पुणे

Pune : प्रवाशांची संख्या वाढल्याने PMPMLचा मोठा निर्णय; तब्बल 'एवढ्या' बस रस्त्यावर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ‘पीएमपी’ प्रशासनाने सुमारे १८५० बस रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बसच्या नादुरुस्तीचे प्रमाण कमी करण्यावर ‘पीएमपी’चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी भर दिला आहे. तर दुसरीकडे कार्यशाळेत येणाऱ्या बसची दुरुस्ती लवकर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘पीएमपी’त बसची संख्या कमी असल्याने उपलब्ध बसपैकी जास्तीत जास्त बसचा वापर करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहे.

‘पीएमपी’मध्ये एकूण २०७९ बस आहेत. यात ९८१ या ‘पीएमपी’च्या मालकीच्या आहेत, तर १०९८ या ठेकेदारांच्या बस आहेत. बसची संख्या २०७९ इतकी जरी असली तरीही प्रत्यक्षात १६४९ बस रस्त्यावर धावतात. उर्वरित बस या दुरुस्तीच्या नावाखाली कार्यशाळेत उभ्या असतात. राखीपौर्णिमा अथवा ठेकेदारांचा जर संप झाला तर मात्र बहुतांश बस रस्त्यावर येतात. नुकत्याच झालेल्या राखीपौर्णिमेसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ‘पीएमपी’ प्रशासनाने १९३० बस प्रवाशांच्या सेवेत आणल्या होत्या. हे लक्षात घेऊन ‘पीएमपी’ने दररोज १८५० बसचे नियोजन करण्यावर भर दिला आहे.

कार्यशाळेचीच ‘दुरुस्ती’

‘पीएमपी’चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी सुरवातीला वाहतूक विभागावर आपले लक्ष केंद्रित केले होते. आता त्यांनी आपला मोर्चा यांत्रिक विभागाकडे वळविला आहे. यांत्रिक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांपासून ते कार्यशाळा व्यवस्थापकापर्यंत सर्वांनाच कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहे. गेल्या काही वर्षांत ‘यांत्रिक’ विभागाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे कामात ढिसाळपणा आला होता. आता मात्र कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत दिले असल्याने बसची दुरुस्ती लवकर होत आहे. शिवाय बसच्या नादुरुस्तीचे प्रमाण देखील कमी होण्यास सुरवात झाली.

दिवसाला तीन कोटींचे उत्पन्न

‘पीएमपी’ला दिवसाला सरासरी एक कोटी ७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यासाठी सुमारे १६४९ बस धावत आहेत. बसची संख्या जेव्हा १८५० होईल तेव्हा प्रवासी उत्पन्नात वाढ होईल. दैनंदिन प्रवासी उत्पन्न तीन कोटी करण्याचे उद्दिष्ट ‘पीएमपी’ने ठरविले आहे.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसची संख्या वाढविणे गरजेचे आहे. कमीतकमी बस कार्यशाळेत राहतील अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १८५० बस धावतील असे नियोजन सुरु आहे.

- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे