E bus Tendernama
पुणे

Pune : मुंबईच्या धर्तीवर पुण्यात येणार 'एवढ्या' डबलडेकर बस

‘पीएमपी’च्या ताफ्यात नवीन ३०० बस दाखल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘पीएमपी’ प्रशासनाने अखेर कॅबचा प्रस्ताव रद्द केला आहे. तसेच पुणे महापालिकेच्या दबाव न जुमानता सात मीटरच्या आकाराची बस न घेता १२ मीटर लांबीची बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘पीएमपी’च्या ताफ्यात नवीन ३०० बस दाखल होत आहे. तसेच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर २० डबलडेकर बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. ‘पीएमपी’ची बैठक पार पडली असून यात वरील तिन्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे.

बैठकीत एकूण १३ विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यातील काही निर्णय थेट प्रवासी सुविधेवर परिणाम करणारे आहेत. तर काही कर्मचाऱ्यांशी निगडित आहे. कॅब सारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेताना पीएमपी प्रशासनाने ही सेवा महाग व प्रवासी हिताची नसल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यामुळे ‘पीएमपी’च्या बस सेवेलाचा फटका बसण्याची भीती होती. तसेच त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर देखील झाला असता. त्यामुळे ‘पीएमपी’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ‘कॅब’ सेवा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो अगदी योग्य देखील आहे.

वीस डबलडेकर बसला मान्यता
पीएमपी प्रशासनाने पहिल्या टप्प्यात २० डबलडेकर बस खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. पुणे महापालिकेने १२ तर पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ बस खरेदी करावी, असे प्रस्तावात म्हटले होते. गुरुवारी दोन्ही महापालिकेने २० डबलडेकर बस खरेदीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या विविध रस्त्यावर डबल डेकर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचे डबलडेकर बस मधून फिरण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ही बस एकूण चाळीस मार्गावर धावण्याचे नियोजन केले असून एका बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. दोन्ही महापालिका यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे.

२०० सीएनजी, १०० नवीन इ बस धावणार
नवीन बसमध्ये २०० बस या ‘सीएनजी’वर धावणाऱ्या असतील तर १०० इ बस असणार आहे. १०० पैकी २० या वातानुकूलित डबलडेकर इ बस असणार आहे. या सर्व बस १२ मीटर लांबीच्या असणार आहे. संचालक मंडळाच्या गुरुवारच्या बैठकीमध्ये १२ मीटरच्या बस खरेदीला मान्यता दिली. यापूर्वी पुणे महापालिका सात मीटर व नऊ मीटरच्या बस घेण्यासाठी ‘पीएमपी’वर दबाव टाकला होता. त्यामुळे ३०० नवीन बस खरेदीचा विषय सहा महिन्यापेक्षा जास्त काळासाठी प्रलंबित होता. गुरुवारी अखेर सात मीटरच्या बस खरेदीच्या विषयावर ‘पीएमपी’ने फुली मारली असून १२ मीटरच्या बस खरेदीला मान्यता दिली आहे.

वीस डबलडेकर बस खरेदीला मान्यता मिळाली आहे. तसेच ३०० नवीन बस खरेदी करण्यास देखील मान्यता दिली. त्यामुळे नवीन बस खरेदीचा मार्ग मोकळा झाला.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३०० नवीन १२ मीटर लांबीच्या बस खरेदीचा निर्णय झाला असला तरी, सात मीटर लांबीच्या बस खरेदी संदर्भात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेशी चर्चा सुरू आहे, असे ‘पीएमपी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. सात मीटर लांबीच्या बस खरेदीचा निर्णय रद्द झालेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 'पीएमपी'च्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी झाली. यात कॅब सेवेचा निर्णय रद्द झाला. गर्दीच्या मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी २० इलेक्ट्रिक डबलडेकर बस घेण्याचा निर्णय झाला आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या ३०० बसमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. बससंख्या वाढल्याने प्रवासी संख्यादेखील वाढेल. परिणामी प्रवासी उत्पन्नात देखील वाढ होणार आहे, तसेच मेट्रोच्या कनेक्टिव्हीटीसाठी ७ मीटर लांबीच्या बसचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे, असेही बकोरीया यांनी स्पष्ट केले.