Pune Tendernama
पुणे

PMC : ठेकेदारांची 'ती' मागणी महापालिकेने का फेटाळली?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये तयार झालेल्या उपपदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर भूस्थिर उपग्रह प्रणाली (जीपीएस ट्रॅकर GPS Tracker) बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे वाहन ठरलेल्या ठिकाणी गेले की नाही, त्यांच्या किती फेऱ्या झाल्या, यावर महापालिका प्रशासनाला नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासह प्रत्येक प्रकल्पावर सीसीटीव्ही लावावेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

शहरातील कचरा प्रश्‍न गंभीर होऊ नये, यासाठी ठेकेदारांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. परंतु मनुष्यबळ उपलब्ध नसणे आणि भूस्थिर उपग्रह प्रणाली लावलेली वाहने उपलब्ध होत नाहीत, असे सांगत भूस्थिर उपग्रह प्रणाली लावण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी ठेकेदारांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रकल्पात गाड्या कधी आल्या, केव्हा बाहेर पडल्या, कोणत्या ठिकाणी गाडी रिकामी केली, यावर प्रशासनाची नजर असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावला.

बायोगॅस, बायोडिझेलची वाहतूक :
शहरात ओल्या-सुक्या कचऱ्याचे प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यात विविध प्रकारचे उपपदार्थ तयार केले जातात. त्याचा वापर पुढे बायोगॅस, बायोडिझेलसह खत तयार केले जाते. सिमेंट कंपन्यांना इंधन म्हणून प्लॅस्टिक आणि चिंध्या पुरविल्या जातात. या उपपदार्थांच्या वाहतुकीसाठी महापालिकेकडून ठेकेदाराला शुल्क दिले जाते.

ठेकेदारांचे म्हणणे काय?
उपपदार्थांची वाहतूक करण्यासाठी दरवेळी विविध गाड्या असतात. त्यामुळे प्रत्येक गाडीस भूस्थिर उपग्रह प्रणाली लावणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

ठेकेदारांना केलेल्या सूचना
१. दिवाळीनंतर कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावेत
२. किमान एक तृतीयांश कर्मचारी प्रकल्पावर उपस्थित असणे आवश्‍यक
३. सकाळच्या सत्रात कचरा वाहतूक मजला रिकामा ठेवावा
४. कचरा वाहतुकीच्या गाड्या थांबवून न ठेवता, त्वरित रिकाम्या कराव्यात
५. यंत्रसामग्री खराब असल्यास रात्रीत दुरुस्ती करावी, त्यामुळे प्रकल्प दिवसा सुरू ठेवता येईल
६. कचरा प्रकल्पातील कचऱ्याची दुर्गंधी पसरू देऊ नका, उपपदार्थांची त्वरित विल्हेवाट लावा
७. दुपारच्या जेवणासाठी प्रकल्प बंद न ठेवता काही कर्मचारी जेवणासाठी नंतर पाठवावेत

दिवाळीनंतर कचऱ्याचे प्रमाण वाढते. त्यावर लवकर प्रक्रिया केली जावी, गाड्या लवकर रिकाम्या केल्या जाव्यात, मनुष्यबळाचा वापर व्यवस्थित करून प्रकल्पातील कामाची गती कमी होऊ नये यासाठी ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. उपपदार्थ वाहतुकीसाठी गाड्यांना ‘जीपीएस’ असणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग