PMC Tendernama
पुणे

देशातील पहिल्या स्मार्टसिटीत पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : देशातील पहिली स्मार्ट सिटी (SmartCity Pune) म्हणवणाऱ्या पुण्यात पाणी आहे, तर वीज नाही आणि वीज आहे तर पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात वेळेवर पाणीपट्टी आणि वीजबिल भरणारे आणि त्यापोटी दर्जेदार सेवा मिळणार, अशी अपेक्षा ठेवणारे पुणेकर मूर्ख ठरले आहेत, अशी बोचरी टीका सजग नागरिक मंचाने केली आहे.

पुणे शहरात सात दिवस चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे गाजर दाखवून २ हजार ४०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. परंतु पावसाने जरा ओढ दिल्याबरोबर चोवीस तास सोडा, चोवीस तासातून एकदासुद्धा पाणीपुरवठा करणे महापालिकेला झेपेनासे झाले आहे.

परिणामी महापालिकेकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा आणि तोही दिवसाकाठी ४ तास केला आहे. असे असताना मंगळवारी सकाळी सदाशिव पेठेत महावितरणने पहाटे ४.३० ते सकाळी ९ पर्यंत वीजपुरवठा खंडित केला. पहिल्याच पावसात महावितरणने पावसाळापूर्व देखभाल दुरूस्तीच्या केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. वीज बंद त्यामुळे पाणी नाही, अशी परिस्थिती नागरिकांवर ओढावली, असेही मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.