पुणे (Pune) : गणेशोत्सवामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी, देखावे पाहण्यासाठी सहभागी होतात. या नागरिकांच्या नैसर्गिक विधीसाठी महापालिका फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यासाठी दरवर्षी टेंडर (Tender) काढते. पण या स्वच्छतागृहांची ठेकेदाराकडून (Contractor) व्यवस्थित स्वच्छता ठेवली जात नसल्याने त्यांचा वापर होत नाही, असे दिसून आले आहे. परिणामी महापालिकेचे पैसे वाया जातात.
फिरत्या स्वच्छतागृहांसाठी २५ लाख रुपयांचे टेंडर काढले आहे. हे काम घेणाऱ्या ठेकेदारासाठी स्वच्छतेबाबत कडक नियम केले तरच या सुविधेचा पुणेकरांना फायदा होणार आहे. अन्यथा फिरती स्वच्छतागृहे म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था होणार आहे.
पुण्यात गणेशोत्सवात राज्यभरातून तसेच परराज्य आणि परदेशातूनही नागरिक येतात. या भाविकांसाठी पायाभूत सुविधा महापालिकेकडून पुरविल्या जातात. या मागचा हेतू उदात्त असला तरी प्रत्यक्षात मात्र या सेवांचा दर्जा खूपच खालावलेला असतो. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर टीका केली जाते.
पुण्याचा गणेशोत्सव प्रामुख्याने कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत साजरा होतो. या मध्यवर्ती भागात मानाच्या गणपीतींसह अनेक जुनी व महत्त्वाची मंडळे आहेत. त्याच प्रमाणे डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन या भागांतून नागरिक पेठांमध्ये गणपती पाहण्यासाठी येतात. त्यांची पार्किंगची व्यवस्था जेथे असते तेथे महापालिकेतर्फे फिरती स्वच्छतागृहे ठेवली जातात. गेल्यावर्षी ४०० फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात आली होती. तसेच मध्यवर्ती भागातील कायमस्वरूपी बांधलेल्या स्वच्छतागृहांचीही व्यवस्था असते.
अशी आहे स्थिती
- भाविकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करताना एका ठिकाणी चार-पाच स्वच्छतागृहे ठेवली जातात. पण तेथे वीज, पाणी, बादलीची व्यवस्था नसते
- स्वच्छतागृह वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक असते, पण एकदा फिरते स्वच्छतागृह ठेवल्यानंतर ठेकेदाराकडून त्याची स्वच्छता केली जात नाही
- त्यामुळे एकदा वापरलेल्या स्वच्छतागृहाचा पुन्हा वापर केला जात नाही
- अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी
- पुरुष आणि महिलांसाठीची फिरती स्वच्छतागृहे लांब ठेवणे आवश्यक असताना ती एकत्र ठेवली जातात
हे करणे गरजेचे
- स्वच्छतागृहांच्या ठिकाणी वीज, पाणी, बदली आवश्यक
- देखभाल करण्यासाठी ठेकेदाराने माणसे ठेवली पाहिजेत
- स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी जेटिंग मशिनचा वापर व्हावा
- फिरत्या स्वच्छतागृहा मुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिक यांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक
- घनकचरा विभाग व क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी आवश्यक
गणेशोत्सवात नागरिकांना स्वच्छतागृहांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी २५ लाख रुपयांचे टेंडर काढले आहे. ठेकेदाराकडून स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवणे, प्रकाश, पाणी व्यवस्था करणे याकडे लक्ष दिले जाईल.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग