pune Tendernama
पुणे

PMC : 'तो' नियम मोडण्यात सिंहगड रोड आघाडीवर; महापालिकेने काय केली कारवाई?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रस्ता आणि पादचारी मार्ग अडवून गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल थाटणाऱ्या २२९ व्यावसायिकांना महापालिकेने (PMC) नोटीस बजावली आहे. दरम्यान, महापालिकेने केलेल्या तपासणीमध्ये पुणे शहरात एकाही गणेश मंडळाने परवानगीपेक्षा जास्त मोठा मंडप घातला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

गणेशोत्सवाला सात सप्टेंबरपासून सुरुवात झाली. घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी पुणेकरांकडून गणेश मूर्तीचे बुकिंग केले जाते. शेवटच्या दोन दिवसांमध्ये मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.

शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मूर्ती विक्रीचे स्टॉल लागले होते. पण हे स्टॉल पादचारी मार्ग, रस्त्यावर लावण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. महापालिकेकडून मूर्ती विक्रीसाठी ज्या जागा निश्‍चित केल्या आहेत तेथे स्टॉल न लावता विक्रेत्यांनी त्यांच्या सोईनुसार थाटल्याचे निदर्शनास आले आहे.

या संदर्भात शहरात आतापर्यंत २२९ मूर्ती विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ३४ नोटीस सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने बजावल्या आहेत. तर येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकाही मूर्ती विक्रेत्याला नोटीस बजावलेली नाही. महापालिकेने गणपती मंडळांना मंडप उभा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.

त्यामध्ये कोणत्या बाजूला किती मंडप असणार याचे माप निश्‍चित केले आहे. पण अनेक मंडळे परवानगीपेक्षा मोठा मंडप घालतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते, अशी तक्रार केली जाते. पण महापालिकेने यंदा केलेल्या तपासणीमध्ये एकाही मंडळाने नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे दिसून आले आहे.

स्टॉलला बजावण्यात आलेल्या नोटीस

क्षेत्रीय कार्यालय - नोटीस संख्या

  • नगर रस्ता - ९

  • येरवडा कळस - २१

  • ढोले पाटील - ३

  • औंध बाणेर - २९

  • शिवाजीनगर घोले रस्ता - १५

  • कोथरूड बावधन - ८

  • धनकवडी सहकारनगर - २४

  • सिंहगड रस्ता - ३४

  • वारजे कर्वेनगर - ७

  • वानवडी रामटेकडी - १

  • कोंढवा येवलेवाडी - ०

  • कसबा विश्रामबाग -१८

  • भवानी पेठ -८

  • बिबवेवाडी - २५

गणेशमूर्ती विक्रेत्यांनी परवानगी न घेता स्टॉल उभे केल्याने २२९ जणांना आणि शिवाजीनगर भागातील तीन गणेश मंडळांना नोटीस बजावण्यात आली आहे.

- सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग