Pune News पुणे : पुणे महापालिकेने (PMC) २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांची देखभाल आणि दिवाबत्तीसाठी तब्बल १८८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही तरतूद १६.२५ टक्के इतकी असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये ४४.२९ टक्के इतकी वाढ केली आहे. त्यामुळे पुणेकरांना यंदा तरी खड्डेमुक्त आणि स्वच्छ रस्ते बघायला मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुण्यातील पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनने पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास केला. त्यामध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत तुलनात्मक अभ्यास करून प्रमुख निरीक्षणे नोंदविली आहेत. या अभ्यासात पीआरओचे अध्यक्ष तन्मय कानिटकर, संचालक नेहा महाजन, मुख्य माहिती विश्लेषक मनोज जोशी आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सायली जोग, संस्थेची विद्यार्थिनी उर्वी बोधले यांनी सहभाग घेतला होता.
रस्त्याची देखभाल आणि दिवाबत्ती यामध्ये रस्त्याची नव्याने निर्मिती करणे या उपश्रेणीसाठी ७०.६ टक्के निधी प्रस्तावित आहे. नियोजन आणि पायाभूत सुविधा विकास या खर्चाच्या श्रेणीमध्ये एकूण खर्चाच्या १३.३० टक्के खर्च दाखविण्यात आला आहे.
या निधीतून नदीकाठ सुधार प्रकल्प, उड्डाणपूल, नदीवरील पूल यांच्या कामासाठी २५.९ टक्के निधी खर्च केला जाणार आहे. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी २२.६३ टक्के दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ८५.२३ टक्के वाढ केली आहे.
पाणी पुरवठा विभागाशी संबंधित कामांसाठी १३.२६ टक्के निधी देण्यात आला आहे. त्यातील २५.४२ टक्के निधी समान पाणी पुरवठा योजनेसाठी दिला आहे. तर ४४.९ टक्के निधी हा पाण्याच्या टाक्या, बोअरवेल, जलवाहिनी यासाठी दिला जाणार आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून त्यातील तरतुदींचे विश्लेषण करून त्या सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहचवता याव्यात यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे कानिटकर यांनी सांगितले.