PMC Tendernama
पुणे

PMC News : पुणे महापालिकेच्या 'या' विभागात होणार क्रांतिकारी बदल? काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : महापालिकेचा (PMC) वाहन विभाग आता कात टाकणार असून या विभागाच्या पुनर्विकासासाठी आता १४ कोटी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत वाहन विभागाच्या पुनर्विकासासाठी १४ कोटी ११ लाख रुपयांच्या खर्चाच्या पूर्वगणनपत्रकास मंजुरी देण्यात आली.

मुकुंदनगर परिसरात महापालिकेचा वाहन विभाग असून हा विभाग ४० वर्षे जुना आहे. या विभागाकडून महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी यांना दैनंदिन वापरासाठी वाहने दिली जातात. संबंधित वाहनांची देखभाल दुरुस्ती केली जाते. याबरोबरच कचरा वाहतूक व अन्य कामांसाठीही संबंधित विभागातून विविध विभागांना वाहने दिली जातात.

सध्या या विभागाकडे एक हजार ३०० वाहने आहेत. गुरुवारी झालेल्या इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत या विभागाच्या पुनर्विकासासाठी १४ कोटी ११ लाख रुपयांच्या पूर्वगणनपत्रकास मंजुरी देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी.बी.यांनी दिली.

असा होणार पुनर्विकास

वाहन विभागाकडे सध्या २१ हजार चौरस मीटर जागा आहे. या विभागाचा पुनर्विकास करताना विभागाच्या शेडची उंची ९ मीटर केली जाणार आहे. या विभागात वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सध्या १४ जागा असून त्या जागा दुपटीने वाढविण्यात येणार आहेत. वाहने धुण्यासाठी एकमेव जागा होती, आता वाहने धुण्यासाठी तीन वॉशिंग विभाग केले जाणार आहेत. वाहने धुण्यासाठीच्या पाणीसाठ्यातही वाढ केली जाणार आहे.

वाहनांचे सुटे भाग ठेवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त विभाग केला जाणार असल्याचे महापालिकेच्या भवन विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी सांगितले. वाहन विभागात २० कार आणि २० ट्रकचे खुले पार्किंग असणार आहे. वाहन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी १३० दुचाकी व ३० कारचे पार्किंग केले जाणार आहे.