BRT Tendernama
पुणे

PMC : घाईघाईत बीआरटी मार्ग हटविणारी पीएमसी बसथांबे काढायला विसरलीय का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वाहतूक कोंडीचे कारण देत पुणे महापालिकेने नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हटविला. मात्र या मार्गाच्या मधोमध उभारलेले आणि होर्डिंग बसवलेले बसथांबे मात्र हटवण्यात आले नाहीत. वापराविना पडून असलेले आणि रस्त्याच्या मधोमध असल्याने हे थांबे आता वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.

पुणे महापालिका प्रशासनाने मागील वर्षी डिसेंबर आणि आता ऑक्टोबर महिन्यात अशा दोन टप्प्यांत नगर रस्त्यावरील बीआरटी हटविली. वाहतूक कोंडीचे कारण देत गोखले संस्था आणि वाहतूक पोलिसांनी तसा अहवाल दिल्याचे सांगण्यात आले होते.

बीआरटी ज्या घाईघाईत हटवण्यात आली तितक्याच तत्परतेने थांबे मात्र हटवण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवणे हा बीआरटीचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे.

होर्डिंगधारकांना झुकते माप देण्याकरता महापालिकेच्या पथ विभागाने याकडे काणाडोळा केला आहे. विमाननगर चौकात सिग्नल सुटल्यावर हजारोंच्या संख्येने वाहने रस्त्याच्या मधून जाताना थांबा अचानक समोर दिसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. हे बस थांबे वापरात नसल्यामुळे तातडीने हटविणे गरजेचे आहे.

रस्त्याच्या मधोमध बसथांबे असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. सिग्नलवरून वेगात वाहने निघाल्यानंतर बसथांब्याजवळ वाहने पुन्हा अडखळतात. फक्त जाहिरातदारांचा विचार करून बसथांबे हटविले जात नाहीत, असे वाटते.

- अब्दुल शेख, स्थानिक नागरिक

बीआरटी मार्गासोबतच बस थांबे हटवायला पाहिजे होते. तेव्हा वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत झाली असती. बसथांबा हटविले नसल्याने बीआरटी बंद करून फायदा झालेला नाही

- सदाभाऊ गायखे, स्थानिक नागरिक

नगर रस्ता बीआरटी मार्ग काढल्यानंतर आता बसथांबे हळूहळू काढायला सुरुवात केली आहे. येरवडा येथील बसथांबा काढण्यात येत आहे.

- संजय धाराव,अधिकारी, पथ विभाग