PMC Tendernama
पुणे

पुणे महापालिकेचा दणका! रस्ता खोदणाऱ्या कंपनीला 9.5 लाखांचा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पावसाळ्यात रस्ते खोदाई करू नये, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून खासगी ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांकडून रस्ते खोदाई सुरू आहे. खराडी येथे बांधकाम व्यावसायिकाकडून विद्युत वाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदाई सुरू असताना महापालिकेच्या भरारी पथकाने कारवाई करत साहित्य जप्त केले. तर संबंधित कंपनीकडून नऊ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. (PMC News)

शहरात जलवाहिनी, मल वाहिनी, गॅस वाहिनी, विद्युत वाहिनी टाकणे, मोबाईल व इंटरनेट केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली जाते. महावितरणची विद्युत वाहिनी टाकण्याचे काम बांधकाम व्यावसायिकाकडूनही केले जाते. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून प्रतिमीटर १२ हजार १९२ रुपये शुल्क घेतले जाते. महावितरणच्या कामासाठी दोन हजार ३५० रुपये प्रति मीटर शुल्क घेतले जाते.

पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत असावेत, खड्डे पडू नयेत यासाठी महापालिकेकडून काळजी घेतली जाते. यासाठी ३० मे पर्यंतच रस्ते खोदाई करावी; त्यानंतर रस्ते लगेचच दुरुस्त करावेत असे आदेश दिले होते. केवळ पाणी पुरवठा व मलःनिसारण विभागाच्या अत्यावश्‍यक कामांना परवानगी दिली आहे. पण, पथ विभागाकडून परवानगी घेतलेल्या खासगी ठेकेदार, बिल्डर व इतर कंपन्यांकडून खोदाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही कंपन्या बेकायदेशीरपणे केबल टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पथ विभागाने २४ तास लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले आहेत.

महापालिकेच्या या पथकाने खराडी येथे पीर साब दर्गा ते महालक्ष्मी लॉन्स या दरम्यान ४०० मीटरची खोदाई करत असताना कारवाई केली. ही कारवाई करून नये यासाठी या भागातील एका माजी आमदाराने महापालिकेवर दबाव आणला. मात्र, महापालिका आयुक्तांनी पावसाळ्यात खोदाई करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे परवानगी असली तरी खोदाई करता येणार नाही, असे सांगितले. अखेर महापालिकेच्या पथकाने फावडे, टिकाव व इतर साहित्य जप्त केले.

पावसाळ्यात रस्ते खोदाई होऊ नये यासाठी पथ विभागाने भरारी पथक नियुक्त केले आहे. या पथकाने खराडी येथे पीर साब दर्गा ते महालक्ष्मी लॉन्स या दरम्यान एका बांधकाम व्यावसायिकावर कारवाई केली. त्यांच्याकडे ४०० मीटरची एचटी लाईन टाकण्याची परवानगी आहे, पण पावसाळ्यात हे काम करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याकडून ४०० मीटरचे प्रतिमीटर दोन हजार ३५० रुपये प्रमाण दंड वसूल केला जाईल.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग, महापालिका