Sewage Chamber  Tendernama
पुणे

पुणे : ठेकेदारांनी चेंबरची दुरुस्ती केली की नाही? माहितीच नाही...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रस्ते, पादचारी मार्गावरील असमान चेंबरमुळे नागरिकांना अडखळत चालावे लागत असताना आता पथ विभागाने पावसाळी गटारांच्या चेंबर दुरुस्तीवर भर दिला आहे. चार दिवसांत जवळपास १२५ चेंबर दुरुस्त केली आहेत. मात्र, सर्वाधिक जास्त डोकेदुखी ठरलेल्या सांडपाणी गटारांच्या चेंबरकडे पुणे महापालिका मलःनिसारण विभागाचे दुर्लक्षच होत आहे. त्यांची दुरुस्ती सुरू केली नसून, संबंधित ठेकेदारांनी माहितीही सादर केलेली नाही. (Pune Municipal Corporation News)

मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच चेंबरमुळे अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. पथ विभागाकडून शहरात पावसाळी गटारांचे काम केले जाते, तर मलःनिसारण विभागाकडून सांडपाणी वाहिन्या टाकल्या जातात. या गटारांची स्वच्छता करता यावी यासाठी ठराविक अंतरावर चेंबर तयार करून त्याला झाकण लावले जाते. पावसाळी गटार व सांडपाण्याचे गटार रस्त्याच्या मध्यभागी टाकल्याने त्यांचे चेंबरही मध्यभागी आले आहेत.

शहरात ३१ हजार पावसाळी चेंबर आहेत, तर सांडपाणी गटाराचे १ लाख २० हजार चेंबर आहेत. यातील बहुतांश चेंबर हे रस्त्याला समपातळीत नाहीत. त्यामुळे हे खड्डे चुकवत गाड्या चालवताना वाहनचालकांची तारांबळ उडते. प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार समोर आल्यानंतर पथ विभागाने दुरुस्ती सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी ठेकेदारांची माहिती मागविणार असल्याचेही सांगितले. पण मलःनिसारण विभागाने अद्याप चेंबर दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही. तसेच ठेकेदारांनी केलेल्या कामाची तपासणीही सुरू केलेली नाही.

पथ विभागाच्या सात कार्यकारी अभियंत्यांच्या हद्दीत रस्त्यातील खड्डे बुजविण्यासह चेंबर दुरुस्तीचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसांत १२५ चेंबरची दुरुस्ती केली आहे. चेंबरभोवतीची खडी निघाल्याने पडलेले खड्डे बुजविले आहेत. पण, सांडपाणी गटाराचे खचलेले चेंबर अद्याप दुरुस्त केले नाहीत.

पथ विभागाकडून खड्डे बुजविण्यासह पावसाळी गटारांचे चेंबर दुरुस्तीचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसात १२५ चेंबर दुरुस्त केले आहेत. सर्व चेंबर दुरुस्त केले जातील.
- बाळासाहेब दांडगे, अधिक्षक अभियंता, पथ विभाग