Pune Tendernama
पुणे

पालिका म्हणते रस्ते 'एकदम ओके'; पुणेकर म्हणतात 'काही ही हं...'

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : हाडे खिळखिळी होणाऱ्या खड्ड्यांपासून वाहनचालकांची सुटका व्हावी म्हणून अगदी कसोशीने प्रयत्न करीत गेल्या तीन दिवसांत ८४८ खड्डे पुणे महापालिकेकडून बुजविण्यात आले आहेत. हे खड्डे बुजविल्यानंतर शहरातील ९० टक्के खड्डे बुजवून रस्ते ‘एकदम ओके’ झाल्याचा दावा सोमवारी (ता. १८) महापालिकेकडून करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी महापालिकेला ३०९ नवीन खड्डे आढळले आहे. जर सोमवारी ९० टक्के खड्डे बुजविण्यात आले होते तर मग शहरात मंगळवारी पुन्हा ३०९ नवीन खड्डे आले कुठून, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (Pune Municipal Corporation News)

वाहनचालकांची खड्ड्यांपासून सुटका व्हावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून पालिकेने शहरातील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स माल आणि कोल्ड इमल्शन वापरून जेट पॅचरद्वारे, पूनावाला फाउंडेशनच्या मशिनद्वारे, तसेच केमिकलयुक्त काँक्रिटचा वापर केला जात आहे. पथ विभागाकडील सात रोलर, १५ रोड मेन्टेनन्स व्हेइकल्स यासाठी वापरले जात आहेत. त्यांच्याद्वारे सुमारे १२६० कोल्ड मिक्स बॅग, ५० ड्रम इमल्शन, ५० टन खडी वापरून ही दुरुस्ती करण्यात आली आल्याची माहिती सोमवारी महापालिकेकडून देण्यात आली आहे. मात्र, एवढे करूनही खड्ड्यांची संख्या आणि नागरिकांचा त्रास नियंत्रणात आलेला नाही.
मंगळवारी महापालिकेला आढळलेल्या नवीन खड्ड्यांमधील २३८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरात केवळ ७१ खड्डे शिल्लक असल्याचा दावा देखील महापालिकेने केला आहे. दैनंदिन खड्डे बुजविण्याच्या कामकाजात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

कुठेच पाणी साठत नाही
पाऊस झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी पाण्याची तळे साचून त्यातून मार्ग काढावा लागत असल्याचा अनुभव वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सर्रास येत आहे. मात्र शहरात कुठेच पाणी साठ्याची ठिकाणे नाहीत, असा अजब दावा महापालिकेने केला आहे.

सोमवारी दिवसभरात जेवढे खड्डे आढळले त्यातील ९० टक्के खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी पाणी साचलेले असते. तसेच नवीन खड्डे देखील तयार होतात. त्यामुळे मंगळवारी नव्याने ३०९ खड्डे आढळले आहे. त्यातील देखील २३८ खड्डे बुजविण्यात आले. आता शहरात केवळ ७१ खड्डे शिल्लक आहे. खड्डे बुजविण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग, महापालिका