Pune Tendernama
पुणे

Pune : यंदा पुन्हा एकदा महापालिकेची हद्दवाढ; नगरसेवकांची संख्याही वाढणार; काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना २०११ची जनगणना आणि चार सदस्यांचा एक प्रभाग ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयामुळे महापालिकेतील (PMC) सदस्य संख्या १६६ होणार असल्याची चर्चा असली, तरी दोन्ही कँटोन्मेंट बोर्डांच्या हद्दीमुळे सदस्य संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट (एमएमसी) मधील तरतुदीनुसार निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना नजीकची लोकसंख्या ग्राह्य धरावी. तसेच चार सदस्यांचा एक प्रभाग करावा, असा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. त्यामुळे प्रभाग रचना करताना ११ गावे आणि त्यानंतर समाविष्ट झालेली २३ गावे यांसह २०११ नुसार पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख. ५६ हजार ग्राह्य धरून रचना तयार केली जाईल, असे प्राथमिकदृष्ट्या सांगितले जाते.

त्यानुसार अस्तित्वातील कायद्यानुसार ३० लाख लोकसंख्येसाठी १६१ आणि त्यावरील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी १ सदस्य या नियमानुसार १६६ सदस्य संख्या होईल, असे गणित मांडले जात आहे.

महापालिका हद्दीत पुणे आणि खडकी कँटोन्मेंटच्या हद्दीचा समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्याची प्रक्रिया दोन वर्षांपासून सुरू आहे. या दोन्ही कँटोन्मेंटच्या हद्दीतील कोणता भाग महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करायचा? याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागतील.

बोर्डांचा अहवाल दोन महिन्यांत

दोन्ही कँटोन्मेंट बोर्ड महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भातील बैठक सोमवारी (ता. ४) दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयात झाली. बैठकीला महापालिका आणि बोर्डाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. बैठकीत दोन्ही कँटोन्मेंट बोर्डाने हद्दीसंदर्भातील आपापला अहवाल दोन महिन्यांत तयार करून महापालिकेला सादर करावा. त्यावर महापालिकेने अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय अंतिम होईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या वर्षात पुन्हा एकदा महापालिकेची हद्दवाढ होईल, असे सांगितले जात आहे.

गावे समाविष्ट झाल्यास (२०११ ची जनगणना)

- ३५ लाख ५६ हजार - पुणे शहराची लोकसंख्या

- ५ लाख - समाविष्ट गावांतील लोकसंख्या

- ७५ हजार- फुरसुंगी आणि उरुळी देवाची लोकसंख्या

- १६१ - ३० लाख लोकसंख्येसाठी सदस्य

- १ - त्यावरील प्रत्येक एक लाखासाठी सदस्य

- १६६ च्या वर - दोन्ही बोर्डांचा समावेश झाल्यास सदस्य

- ५ लाख - समाविष्ट गावांतील लोकसंख्या

कँटोन्मेंटची स्थिती (२०११ ची जनगणना)

- ७१ हजार ७८१ - पुणे कँटोन्मेंटची लोकसंख्या

- ७८ हजार ६८४ - खडकी बोर्डाची लोकसंख्या