PM Narendra Modi Tendernama
पुणे

PM Modi: मोदींच्या हस्ते 6 ऑगस्टला राज्यातील 'या' कामांचे भूमिपूजन

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : 'अमृत भारत' योजनेत समाविष्ट झालेल्या पुणे विभागातील तीन स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन सहा ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 'ऑनलाइन' माध्यमातून होईल.

यात तळेगाव,आकुर्डी व कोल्हापूर या स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी सुमारे ११६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.

या स्थानकांचा पुनर्विकास झाल्यानंतर प्रवासी सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने देशातील निवडक स्थानकांचा या योजनेत समावेश केला आहे. पुणे विभागातील १५ स्थानकांचा समावेश आहे. यातील तीन स्थानकांवर सहा ऑगस्ट रोजी कार्यक्रम होतील.

पंतप्रधान ऑनलाइन माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात भूमिपूजन करतील. प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या हस्ते भूमिपूजन होईल. तळेगाव स्थानकासाठी ४०.३ कोटी, कोल्हापूर स्थानकासाठी ४३, कोटी व आकुर्डी स्थानकासाठी : ३३.०८ कोटी रुपयांचा अपेक्षित आहे.

प्रवाशांना सुविधा मिळणार...

स्थानकांचा पुनर्विकास करताना प्रवासी सुविधांना महत्त्व देण्यात आले आहे. यात विश्रांती व शयनयान कक्षांचा विस्तार करणे, फलाटावर छप्पर घालणे, स्थानकाचा परिसर वाढविणे, प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करणे, प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ मिळावेत म्हणून 'फूड प्लाझा', आरक्षण केंद्र, करंट तिकीट केंद्र तसेच अन्य कार्यालयांचा विकास, सरकता जिना व लिफ्ट आदी कामे केली जाणार आहेत.

अमृत भारत' योजनेत समाविष्ट असलेल्या तीन स्थानकांचे भूमिपूजन होत आहे. स्थानकांचा पुनर्विकास होणार असल्याने प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील.

- डॉ. रामदास भिसे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे