Steel Girder Bridge Tendernama
पुणे

Pune : विद्यापीठ चौकात वर्षभरातच होणार उड्डाणपूल; असा आहे प्लॅन...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकातील (SPPU Chowk) दुमजली उड्डाणपुलाचे (Flyover) काम दोन वर्षांऐवजी एका वर्षात करण्यासाठी १७० कोटी रुपयांचा अधिक खर्च येणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे लोखंडी गर्डर टाकून उड्डाणपूल उभारण्याच्या पर्यायाचा महापालिकेकडून विचार केला जात आहे. त्यामुळे जानेवारी २०२४ ला उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊ शकते, त्याविषयी तांत्रिक व कायदेशीर बाबी लक्षात घेण्यात येत आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे.

विद्यापीठसमोरील आचार्य आनंदऋषी महाराज चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याविषयी पीएमआरडीए, महापालिका, टाटा कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी बैठक झाली. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी सध्या उपलब्ध असणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडींग केल्यास रस्ता आणखी अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेकडून सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील रस्ते मोठे करणे, पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम केले जात आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी स्थानिक सोसायट्या, रहिवाशांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी दिली.

विद्यापीठासमोरील चौकातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने दुमजली उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

याविषयी विक्रम कुमार म्हणाले, आगामी काही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. तेथे पिलर टाकण्याचे काम सुरू होणार असल्याने एकूण रस्त्यापैकी १० मीटर रस्त्यावर बॅरिकेडींग होईल. वाहतुकीला अडथळा ठरू नये, यासाठी जेथे काम सुरू आहे, तेथेच बॅरिकेडींग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल. परंतु, वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन एका वर्षातच पुलाचे काम पूर्ण करण्याचा पर्याय पुढे आला.

टाटा कंपनीने त्याबाबतचा आराखडा तयार केला असून, २६ जानेवारी २०२४ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे त्यांचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी अतिरिक्त १७० कोटी रुपये खर्च येणार आहे. तांत्रिक व कायदेशीर बाजू सांभाळून पुढील निर्णय घेऊ सध्या हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन वर्षे लागतील, मात्र स्टील गर्डर टाकून हे काम केल्यास उड्डाणपुलाचे काम जानेवारी २०२४ रोजी पूर्ण होऊ शकेल. त्यासाठी १७० कोटी रुपये अधिक लागणार आहे. नागरिकांना वेळेत पूल उपलब्ध होत असल्यास त्यांची गैरसोय टळेल. त्यादृष्टिने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे.
- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त