पिंपरी (Pimpri) : ‘‘शहरातील व्यापारी संकुल गाळे किंवा भाजी मंडईतील ओटे आरक्षित आणि निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार आकुर्डी, रेल्वेस्थानक, चिखली, रावेत, दापोडी आदी ठिकाणी दिव्यांग व्यक्ती, महिला आणि अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती खुल्या गटातील व्यक्तींना आरक्षण देण्यात येणार आहे. उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. गाळे आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
गाळे वाटप सोडतीमध्ये व्यापारी संकुलातील गाळे आणि भाजी मंडई ओटे आरक्षित ठेवले आहेत. दिव्यांगांना पाच टक्के आरक्षण दिले आहे. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींना पाच टक्के आरक्षण; महिलांसाठी ३० टक्के आरक्षण दिले आहे. खुल्या गटातील व्यक्तींना उर्वरित गाळेवाटप केले जाणार आहे. सोडतीच्यावेळी भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, मुख्य लेखा परीक्षण विभागाचे लेखाधिकारी राजन वडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
अशी आहे समिती
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे हे समितीचे अध्यक्ष आहेत. भूमी-जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. इतर सदस्यांमध्ये मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता राजेश मोराणकर यांचा समावेश आहे.
असे आहेत गाळे
- आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळील जागेत खाद्य पदार्थ केंद्र उभारण्यात येणार आहे. याठिकाणी ४९ गाळे उपलब्ध असून दिव्यांग व्यक्तींना दोन गाळे; अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींना दोन गाळे, महिलांसाठी १५ गाळे उपलब्ध केले असून खुल्या गटासाठी ३० गाळे उपलब्ध आहेत.
- चिखली सेक्टर १७ आणि १९ घरकुल येथील नवीन भाजी मंडईतील ४२ ओटे, गाळे उपलब्ध आहेत.
- त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना दोन, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींना दोन, महिलांसाठी १३ व खुल्या गटासाठी २५ गाळे उपलब्ध राहणार आहेत.
- चिखली सेक्टर १७ आणि १९ घरकुल येथील नव्याने विकसित इमारतीत ११ व्यापारी गाळे उपलब्ध आहेत. दिव्यांगांसाठी एक, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींना एक, महिलांसाठी तीन आणि खुल्या गटासाठी सहा गाळे उपलब्ध आहेत.
- रावेत सर्वे क्रमांक ९५ मध्ये पार्किंग, शॉपिंग सेंटर मार्केटमध्ये दुकाने व ऑफिस १२ गाळे उपलब्ध आहेत. त्यानुसार, दिव्यांगांसाठी एक, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींना एक, महिलांसाठी चार आणि खुला गटासाठी सहा गाळे उपलब्ध आहेत.
- दापोडीतील सर्वे क्रमांक १२ आणि १३ मधील वाहनतळ, रिटेल मार्केट इमारतीमधील व्यापारी १० गाळे उपलब्ध आहेत. दिव्यांगांना एक, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींना एक, महिलांना तीन, खुल्या गटाला पाच गाळे उपलब्ध राहणार आहेत.