PCMC Tendernama
पुणे

Pimpri : ठेकेदारांचे हित जपण्यासाठी टेंडरऐवजी घातला 'हा' घोळ

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : महापालिकेच्‍या उद्यान विभागाच्‍या कामांसाठी टेंडरऐवजी वस्‍तूंच्‍या दराचे कोटेशन मागविण्यात आले आहे. ठेकेदारांचे हित जपण्यासाठी उद्यान विभागाने हा घोळ घातल्‍याचे चित्र आहे. कोटेशनमध्ये ठेकेदाराकडून आलेल्‍या दरांची स्‍पष्टता होणार नाही. त्‍यामुळे या कामात पारदर्शकता येणार नसल्‍याचे दिसते. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या केवळ दर मागविले आहेत. त्‍यानुसार रीतसर आयुक्‍तांकडे मांडणी करून टेंडर काढले जातील.

महापालिकेच्‍या उद्यान विभागाकडून उद्यानातील खेळण्यांच्या साहित्‍यांची देखभाल दुरुस्ती तसेच नवीन साहित्याचा पुरवठा करण्यासाठी वस्‍तूंच्‍या दराचे कोटेशन मागविण्यात आले आहे. जाहीर प्रकटनाद्वारे १९ जुलै पर्यंत कोटेशन जमा करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. उद्यानातील काही वस्‍तूंचे तुटलेले भाग दुरुस्त करून देणे. नवीन खेळणी पुरवठा करणे या बाबतच्‍या कामासाठी हे आवाहन करण्यात आले होते. टेंडर प्रसिद्धीपूर्वीच कोटेशन मागविण्यात आल्‍याने या प्रक्रियेत पारदर्शीपणा येणार नाही. कोटेशन मागविल्‍यामुळे कोणत्‍या ठेकेदाराने किती रुपये दराने कोटेशन सादर केले आहे, याची माहिती समजणार नाही. महापालिकेला अपेक्षित दर जाहीर प्रकटनामध्ये दिलेला नाही. त्‍यामुळे ठराविक ठेकेदारांना काम मिळण्याच्‍या उद्देशानेच कोटेशन मागविण्यात आले असल्‍याची शंका निर्माण होत आहे. आवश्‍यक वस्तूंची स्पष्टता विभागाच्‍या वतीने दिलेली नाही. तसेच सुट्या भागांच्‍या नावाखाली कोटेशन मागविले आहे. मात्र दिलेली यादी ही सुटे भागच नसून ४४ नवीन खेळण्यांचे आहे. त्‍यामुळे ही प्रक्रिया संशयास्‍पद राबविल्‍याची चर्चा आहे.

सध्या केवळ वस्‍तूंचे दर ठेकेदारांकडून मागविण्यात आले असल्‍याचे उद्यान विभागाच्‍या वतीने सांगण्यात आले आहे. त्‍याची स्‍पष्टता नसली तरी सध्या ठेकेदाराकडून आलेले दर आणि सूचना याबाबत आयुक्‍तांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्‍याचे अधिकारी सांगत आहेत. त्‍यानंतर रीतसर निविदा प्रक्रिया राबवू असे अधिकारी सांगत आहेत.

अंदाजे किंमती माहिती होण्यासाठी आपण ठेकेदारांकडून फक्‍त दर मागविले आहेत. तसेच काही सूचना असतील कळविण्याचे आवाहन केले आहे. त्‍यानुसार जमा झालेली माहिती, वस्‍तूंच्‍या दिलेल्‍या किंमती याबाबतचा प्रस्‍ताव आयुक्‍तांकडे दाखल करणार आहे. त्‍यानंतर आपण टेंडर प्रक्रिया राबविणार आहोत.

- रविकिरण घोडके, उपायुक्‍त, उद्यान विभाग