Pune Tendernama
पुणे

PCMC महापालिका आयुक्तांनी पुणे ते पिंपरीपर्यंत केला मेट्रोने प्रवास, कारण...

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज मेट्रोतून प्रवास केला. याबाबतचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांचा मेट्रो प्रवास, पिंपरी-चिंचवड शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

मेट्रो स्थानकावर उभे राहून गाडीची वाट पाहत असणाऱ्या आयुक्त सिंह यांच्या छायाचित्राबाबत, ‘सामान्य व्यक्तींप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या पदावरील व्यक्तीसुद्धा मेट्रोने प्रवास करतात, हे बघून चांगलं वाटलं.’ अशी कमेंट्स संजय बनसोडे या व्यक्तीने केली आहे. सध्या ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे.

त्याबाबत आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘मी दिल्लीचा रहिवासी आहे. तिथे नेहमीच मेट्रोने प्रवास करतो. बुधवारी मेट्रो संदर्भात पुण्यात बैठक होती. त्यासाठी पीसीएमसी (पिंपरी) स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक आणि बैठक संपल्यानंतर शिवाजीनगर ते पिंपरी असा प्रवास केला. सार्वजनिक वाहतूक सुविधा सक्षम केली जात आहे. त्याचाच एक भाग मेट्रो आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी मेट्रोने वा पीएमपी बसने प्रवास करायला हवा. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. वेळ वाचवण्यासाठी मेट्रो प्रवास सोयीचा आहे.’’