PCMC Tendernama
पुणे

Pimpri : महापालिकेने टेंडरमधील अटी-शर्थीमध्ये का केला बदल?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : महापालिकेच्या भांडार विभागामार्फत शहरातील महापालिका शाळांसाठी बाक, टेबल-खुर्ची खरेदी करण्याची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, या टेंडरमधील अटी-शर्थीमध्ये बदल केल्याची माहिती समोर आली आहे. बदललेल्या अटी-शर्तीमुळे या टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे स्पर्धा होण्यास अडचण येत आहे. टेंडर प्रक्रियामधील अटी शर्ती सर्वसमावेशक करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

महापालिका शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची, बाक, (बेंच) तसेच, शाळेतील फर्निचर खरेदी करण्यासाठी भांडार विभाग यांच्यावतीने २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. हे टेंडर विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे उपलब्ध असणारे प्रमाणपत्र, कागदपत्रानुसार काढण्यात आली आहे. यामध्ये सात वर्षाच्या अनुभवपत्राची मागणी केली आहे. शॉपॲक्टमध्ये फर्निचरचा उल्लेख असावा, अशा अटी- शर्थी आहेत. टेंडर प्रक्रियेमधील अटी शर्ती तयार करून रिंग तयार केली आहे, या टेंडरप्रक्रीयेतील अटी-शर्ती तयार केल्याने काही ठेकेदारांची रिंग तयार झाली आहे.

बदलेल्या अटी

- एक ते सात वर्षाचे अनुभवपत्र

- फर्निचर साहित्याचे स्वतः उत्पादक किंवा पुरवठाधारक असणे आवश्‍यक

- आयएसओ नामांकित असल्याबाबतचे वैद्य मुदतीत प्रमाणपत्र आवश्‍यक

- फर्निचर साहित्याचे अग्निविरोधक असल्याचे प्रमाणपत्र

‘‘दिल्ली शाळांच्या धर्तीवर पिंपरी महापालिकेतील शाळांमध्ये बाकांची रचना करणार आहोत. दिल्ली दौरा केलेल्या समितीच्या सूचनांनुसार बाकांची मागणी करत आहोत. त्यानुसार टेंडर मागविले आहेत. सात वर्षाच्या अनुभवपत्राची मागणी केली होती, त्‍यामध्ये बदल करत एक ते सात वर्षाचा अनुभव असावा, असे केले आहे.’’

- नीलेश बधाने, सहाय्यक आयुक्त मध्यवर्ती भांडार विभाग