Pimpri Chinchwad Tendernama
पुणे

Pimpri Chinchwad : 'या' कारणांमुळे रखडलाय पिंपरी-चिंचवडचा विकास?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराच्या प्रगतीत अडथळा ठरत आहे. काही प्रकल्प पुणे महापालिकेच्या (PMC) सहकार्याने पूर्ण व्हायचे असून, काही प्रकल्प राज्य तर, काही केंद्र सरकारच्या सहकार्याने पूर्ण व्हायचे आहेत. काही प्रकल्पांना भूसंपादनाअभावी ‘खो’ बसला आहे. काही प्रकल्प अर्धवट आहेत. ते पूर्ण झाल्यास शहराच्या प्रगतीची गाडी सुसाट धावणार आहे.

मुंबई-पुणे महामार्ग, आळंदी-पुणे पालखी मार्ग, भोसरी-निगडी टेल्को रस्ता, भोसरी मोशी प्राधिकरण-निगडी स्पाइन रस्ता, देहू-आळंदी रस्ता ही शहरातील प्रशस्त रस्ते आहेत. अन्य मोठ्या रस्त्यांची काहीअंशी कामे झाली आहेत. मात्र, रखडलेले भूसंपादन, न्यायप्रविष्ट प्रकरणे, ठेकेदारांकडून होणारा विलंब आणि प्रशासनाचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे बहुतांश प्रकल्पांची कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत.

काहींची कामे संथगतीने सुरू आहेत. या सर्व प्रकल्पांना गती दिल्यास आणि त्यांतील अडथळे दूर केल्यास शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल. त्यासाठी सरकारसह प्रशासनानेही जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संथगतीने काम सुरू असलेले प्रकल्प

- बोपखेल - खडकी बाजार जोडणारा मुळा नदीवरील पूल

- जुनी सांगवी - बोपोडी जोडणारा मुळी नदीवरील पूल

- थेरगाव - चिंचवडगाव जोडणारा पवना नदीवरील पूल

- पिंपरीगाव - पिंपळे सौदागर जोडणारा पवना नदीवरील पूल

- पिंपरीगाव - मुंबई-पुणे महामार्ग जोडणारा डेअरी फार्म उड्डाणपूल

- भामाआसखेड पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत विविध कामे

पूर्णपणे काम थांबलेले प्रकल्प

- वाकड मानकर चौक - बाणेर जोडणारा मुळा नदीवरील पूल

- काळेवाडी फाटा - चिखली (देहू-आळंदी रस्ता) बीआरटी मार्गाचे आयुक्त बंगल्यासमोरील काम

- निगडी भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे बीआरटी मार्गाचे किवळेजवळ रखडलेले भूसंपादन

- लोहगाव-चऱ्होली-वडमुखवाडी-नाशिक महामार्ग जोडणारा ९० मीटर रुंद रस्त्याचे काही ठिकाणी रखडलेले भूसंपादन

- निगडी-मोशी प्राधिकरण स्पाइन रस्त्याची त्रिवेणीनगर येथील जोडणी व निर्मिती

- चिंबळी-डुडुळगाव-मोशी जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल

प्रस्तावित प्रकल्पांना मिळेना मुहूर्त

- देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूकडील १२ मीटर रुंद सेवा रस्ता

- पुणे-नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा-मोशी-चाकणपर्यंत रुंदीकरण व एलिव्हेटेड मार्ग

- वाकड-पिंपळे सौदागर-नाशिक फाटा-भोसरी-चाकण मेट्रो मार्ग

- उच्च क्षमता बहुउद्देश वहन रस्ता (एचसीएमटीआर) प्रकल्प वर्षानुवर्षे कागदावर

- वाल्हेकरवाडी-ताथवडे डेअरी फार्म रस्ता आणि पवना नदीवरील उड्डाणपूल

- पुणे-लोणावळा लोहमार्ग चौपदरीकरण

शहरातील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प

१. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र मोशी (अद्याप अपूर्ण)

२. छत्रपती संभाजी महाराज स्मारक मोशी (जागेत बदल)

३. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मोशी (प्रस्ताव मंजूर)

४. महापालिकेची पर्यावरणपूरक इमारत चिंचवड स्टेशन (काम सुरू)

५. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र (ट्रेड सेंटर) चिंचवड स्टेशन (कागदावर)

६. बर्न वॉर्ड व कॅन्सर हॉस्पिटल (प्रक्रिया सुरू)