Pune Tendernama
पुणे

Pune : पिंपरी ते स्वारगेट मेट्रो प्रवास अवघ्या 35 मिनिटांत अन् तिकीट केवळ...

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी ते स्वारगेट मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली आहे. आता अवघ्या ३५ मिनिटात केवळ ३० रुपयांत स्‍वारगेटपर्यंत जाता येत आहे. कमी खर्चात जलदगतीने प्रवास होत असल्‍याने नागरिकांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली आहे. ऑक्‍टोबरमध्ये पहिल्‍या आठवड्यातील पाच दिवसात साडे तीन लाख प्रवाशांनी प्रवास केल्‍याची नोंद आहे. तर मेट्रोच्‍या उत्‍पन्‍नातही भर पडली असून, पाच दिवसांत ५६ लाख रुपयांचे उत्‍पन्‍न मेट्रो प्रशासनाला प्राप्‍त झाले आहे.

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा साडे तीन किलोमीटर अंतर असणारा भुयारी मेट्रो मार्ग प्रवाशांकरिता सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते २९ सप्‍टेंबर रोजी त्‍याचे ऑनलाइन उद्घाटन पार पडले. या प्रवासादरम्‍यान एकूण तीन स्थानकांचा समावेश आहे. यामुळे आता पिंपरी ते स्वारगेट असा १७.५ किलोमीटर प्रवास आहे. यामध्ये १४ स्‍थानकांचा समावेश आहे. हे मार्ग सुरू झाल्‍याने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पिंपरी ते स्वारगेटपर्यंत थेट प्रवास करता येत आहे. हा प्रवास अवघ्या ३० रुपयांत आणि ३५ मिनिटात करता येत आहे. वेळ आणि पैशांची बचत होत असल्‍याने प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. २३ सप्‍टेंबर रोजी पिंपरी ते जिल्हा न्यायालय या मार्गावर ४४ हजार ८०२ प्रवाशांनी प्रवास केला होता तर मेट्रो सुरू झाल्‍यानंतर आठवड्यातील पहिल्या दिवशी ३० सप्‍टेंबर रोजी याच मार्गावर ७१ हजार ५६७ प्रवाशांनी प्रवास केला असल्‍याची नोंद आहे. प्रवासी संख्येत २६ हजारांनी वाढ झाली आहे. या कालावधीत वनाज ते रामवाडी मार्गावर केवळ पाच हजार प्रवासी वाढले आहेत. ऑक्‍टोबरच्‍या पहिल्‍याच आठवड्यात साडे तीन लाख प्रवासी संख्येची नोंद आहे. त्‍याद्वारे ५६ लाखांचे उत्‍पन्‍न मेट्रो प्रशासनाला मिळाले आहे.

मेट्रोची वारंवारिता वाढणार -

मेट्रो प्रशासनाने पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गावर गर्दीच्या वेळेस मेट्रोची वारंवारिता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ६ ते ८, ११ ते दुपारी ४ आणि रात्री ८ ते १० या वेळेत दर १० मिनिटांनी, तर सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत दर सात मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.

दिनांक प्रवासी संख्या उत्‍पन्‍न

१) १ ऑक्‍टोबर ७०३६१ ११ लाख ६७ हजार ९०२

२) २ ऑक्‍टोबर ७०१३३ १२ लाख ५५ हजार ४१६

३) ३ ऑक्‍टोबर ६३६८३ १० लाख ७८ हजार ३९३

४) ४ ऑक्‍टोबर ६५२७७ १० लाख ९७ हजार ४६२

५) ५ ऑक्‍टोबर ७६०८७ ९ लाख ९९ हजार २९६

एकूण - ३ लाख ४५ हजार ५४१ ५५ लाख ९८ हजार ४६९

‘‘पिंपरी ते स्‍वारगेट मेट्रो सेवा सुरू झाल्‍यामुळे प्रवाशांना जलदगतीने प्रवास करता येत आहे. प्रतिसाद देखील चांगला वाढला आहे. मेट्रो स्‍टेशनजवळ बस देखील त्वरित उपलब्ध होत आहे. त्‍यामुळे नागरिकांना शहरातील विविध भागात प्रवास करणे सोपे झाले आहे.

- हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो पुणे.