Pune Tendernama
पुणे

पुण्यात नदीकाठ सुधार योजनेतील वृक्षतोडीचा अनोखा निषेध; आता आंदोलन

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नदीकाठ सुधार योजनेच्या कामातील वृक्षतोडीच्या विरोधात महापालिकेने दिलेला ‘पर्यावरण दूत’ हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रीतील अकरा कार्यकर्त्यांनी परत केला आहे. दरम्यान, शहराचे पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी येत्या शनिवारी (ता. २९) चिपको आंदोलन करण्यात येणार आहे.

नदीकाठ सुधार योजना आणि बालभारती ते पौड फाटा हा वेताळ टेकडीवरील प्रस्तावित रस्ता या कामांवरून पर्यावरणप्रेमी आणि महापालिका प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. नदीकाठ सुधार योजनेत दहा हजार झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेचा हा पुरस्कार परत करीत आहोत, अशी माहिती राजीव पंडित, केतकी घाटे, सत्या नारायण, रणजित गाडगीळ, डॉ. गुरुदास नूलकर, शैलजा देशपांडे, अनंत घरत, अमिताभ मल्लिक, वैशाली पाटकर आणि डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी दिली.

नुकताच महापालिकेने वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या २४ पर्यावरण कार्यकर्ते, प्रेमी, अभ्यासक यांचा सत्कार केला होता. तसेच नागरिकांनी केवळ झाडेच नाही तर स्वत:चा जीव वाचविण्यासाठी २९ एप्रिल रोजी होणाऱ्या चिपको आंदोलनात सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

‘दुर्मीळ वृक्षांना बाधा नाही’

नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये जुन्या व दुर्मीळ वृक्षांचा समावेश नाही. समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारी माहिती फिरत आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत संगम पूल ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या ठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदीलगत असणारे ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडले जाणार असल्याची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. तसेच त्या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ झाडे समाविष्ट असल्याचेही म्हटले आहे. प्रत्यक्षात या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट, नदीकाठच्या बाधित होणारे वृक्षांपैकी ३ हजार १४२ वृक्ष न काढता त्यांचे जतन होणार आहे. काढलेल्या वृक्षांच्या बदल्यात ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावले जाणार आहेत. शहराच्या मध्यभागी वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही काठांवर हरितपट्टा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरीबाभूळ, विलायती चिंच अशा झाडांचे प्रमाण जास्त आहे. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम करीत असताना बाधित होणाऱ्या एकूण वृक्षांपैकी १ हजार ५३८ झाडे संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे. त्यापैकी बाभूळ ४४१, सुबाभूळ ८०४ आणि विलायती बाभूळ/विलायती किकर ४८९ अशी सुमारे १ हजार ५३४ झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच या प्रजातींमधील आहेत. हे प्रमाण एकूण काढावयाच्या वृक्षांच्या तुलनेत जवळपास ९९ टक्के आहे, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) यांनी स्पष्ट केले.