Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune : चांदणी चौकातील पादचारी पुलाच्या कामास अखेर सुरवात; तीन महिन्यात...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकातील पादचारी पुलाच्या कामास अखेर सुरवात झाली. पुलाच्या दोन्ही बाजूस खांब उभारणीचे काम सुरू झाले आहे. तीन महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण होईल. ज्या प्रवाशांना मुंबईला जायचे आहे त्यांची देखील मोठी सोय होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पादचाऱ्यांसाठी नवीन पूल बांधण्यात येत आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्चून १२५ मीटर लांबीचा व ६.६ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येत आहे. हा पूल पाषाण ते मुंबईच्या दिशेने असलेल्या बसथांबा दरम्यान बांधण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ८६५ कोटी रुपये खर्चून चांदणी चौकात आठ रॅम्पसह मुख्य रस्ता बांधला. परिणामी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला. चांदणी चौकात रस्त्याचे काम होण्यापूर्वी रोज या रस्त्यावरून सुमारे ३० ते ३२ हजार वाहनांची वाहतूक होत असे. आता याची क्षमता वाढली आहे. रोज साधारणपणे दीड लाख वाहने या रस्त्यावरून सहज धावू शकतील अशी याची क्षमता झाली आहे. मात्र पादचाऱ्यांना मुंबईला जाणारी बस पकडण्यासाठी अथवा रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. येथेच एसटीचा थांबा आहे.

परिसरातील अनेक नागरिक एसटीने मुंबईला जाण्यासाठी येथील बस थांब्यावर येतात. मात्र थांब्यापर्यंतचा प्रवास हा धोकादायक असल्याने नागरिकांनी पूल बांधण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पादचारी पुलाचा प्रस्ताव सहा ते सात महिन्यांपूर्वी मुख्यालयाला पाठवले होते. त्याला मागच्या महिन्यात मंजुरी मिळाली. तर आता प्रत्यक्षात कामदेखील सुरू झाले आहे. साधारणपणे तीन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची आशा आहे. यामुळे पादचाऱ्यांना बसथांब्याकडे जाताना रस्ता ओलांडून जाण्याची गरज नाही. ते पुलावरून सुरक्षितपणे जाऊ शकतील.

पादचारी पुलाचे काम सुरू झाले आहे. तीन महिन्यात हा पूल बांधला जाईल. यामुळे नागरिकांना धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागणार नाही.

- संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे