पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने (PCMC) मामुर्डी आणि सांगवडेच्या पुलासाठी आलेल्या पाचपैकी चार ठेकेदार (Contractors) अपात्र ठरले आहेत. टेंडरमधील अटी, शर्तीची पूर्तता होऊ न शकल्याने हे ठेकेदार अपात्र ठरले. त्यामुळे या कामासाठी पुन्हा नव्याने टेंडर मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे या पुलाचे काम लांबणीवर पडणार असून, नागरिकांना आणखी काही वर्षे गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
या कामाचे टेंडर १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला खो बसला होता. आचारसंहितेनंतर या पाच ठेकेदारांच्या टेंडर प्राप्त झाल्या. त्या बाबत आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. प्रस्तावावर आयुक्तांनी योग्य त्या सूचना केल्या.
त्यामध्ये महापालिकेने दिलेल्या अटी, शर्तींची पूर्तता संबंधित ठेकेदारांकडून पूर्ण होत नव्हती. त्यामुळे चार ठेकेदार अपात्र ठरले. त्यामुळे आता पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाचे काम लांबणीवर पडत आहे. शहराच्या सीमेवर असलेल्या मामुर्डी व किवळे भागातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्यासाठी जवळचा पूल नाही. नागरिकांना मोठा वळसा मारून ये-जा करावी लागते. हा पूल झाल्यास वेळ व प्रवास खर्च वाचणार आहे. नव्या आराखड्यानुसार मुख्य पूल १२ मीटर रुंदीचा ९० मीटर लांबीचा असणार आहे.
अटी आणि शर्तीची पूर्तता न केल्याने चार ठेकेदार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. लवकरच त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
- ज्ञानदेव जुंधारे, सह शहर अभियंता, स्थापत्य विभाग.