Pothole (File) Tendernama
पुणे

PCMC : पीसीएमसीतील वाहतुकीचा का मंदावला वेग?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी शहरातून जाणारे महामार्ग असो की मोठे रस्ते, मध्यवर्ती भागातील रस्ते असो की उपनगरांतील, बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीचा सामनाही करावा लागत आहे.

पावसामुळे केवळ मुरूम-माती, खडी, पेव्हिंग ब्लॉक, जीएसबी (ग्रैनुलर सब बेस), कोल्ड मिक्स आदी साहित्य वापरून खड्डे भरले जात आहेत. त्यामुळे चकचकीत डांबरी रस्ते पावसाळ्यानंतर अर्थात एक महिन्यानंतरच वापरायला मिळतील, असे दिसते.

मुंबई-पुणे (निगडी ते दापोडी), मुंबई-बंगळुरू (देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्ता - किवळे ते वाकड), मुंबई-नाशिक (नाशिक फाटा कासारवाडी ते मोशी इंद्रायणी नदी पूल) या महामार्गांसह टेल्को रस्ता, स्पाइन रस्ता, नाशिक फाटा ते वाकड, सांगवी फाटा ते रावेत- किवळे, काळेवाडी फाटा ते चिखली, देहू-आळंदी (विठ्ठलवाडी ते डुडुळगाव) या मोठ्या रस्त्यांसह एकूण रस्त्यांची लांबी सुमारे ६३३ किलोमीटर आहे.

मुंबई-पुणे महामार्ग व स्पाइन रस्त्याला सेवा रस्ते आहेत. बाह्यवळण मार्गाला काही ठिकाणी सेवा रस्ता आहे. त्यांसह जवळपास सर्वच रस्त्यांवर सद्यःस्थितीत खड्डे पडले आहेत. विविध वाहिन्यांसाठी खोदलेले आडवे चरही रस्त्यांवर आहेत. पावसामुळे खड्डे व चर रुंद झाले आहेत. त्यांची दुरुस्ती महापालिकेकडून सुरू आहे. मात्र, त्यासाठी मुरूम-माती, खडी, पेव्हिंग ब्लॉक, जीएसबी यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

काही ठिकाणी कोल्डमिक्स वापरले जात आहे. त्यामुळे पॅच निर्माण होत आहेत. ते रस्त्याच्या पातळीपेक्षा कमी व जास्त आहेत. त्यामुळे खोलगट भाग किंवा उंचवटे निर्माण होत आहेत. परिणामी खड्ड्यांपेक्षा ते नकोसे झाले आहेत. ड्रेनेज लाइनच्या चेंबरलगतही खड्डे पडले असून, काही झाकणे एका बाजूला झुकून धोकादायक झाले आहेत.

महापालिकेचा दावा

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत जुलै अखेर २००३ खड्डे आढळले होते. त्यांपैकी एक हजार ६३९ खड्डे १३ जुलैपर्यंत आढळून आले होते. त्यानंतर २२ जुलै अखेर ३६४ खड्डे आढळले होते. त्यातील कोल्ड मिक्सने एक हजार ११, खडीने ३५६, पेव्हिंग ब्लॉकने ६६, कॉंक्रिटने १४७ असे एक हजार ५८० खड्डे पूर्णतः बुजविल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तरीही शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर खड्डे आढळत आहेत.

रुपीनगरमधील श्रमिक सोसायटी रस्त्यावरील खड्डे खडी टाकून बुजविले आहेत. प्ले ग्राउंड आहे, असे सांगून रस्ता न करता तात्पुरती मलम पट्टी केली आहे. हा रस्ता सोसायटीतील नागरिक वापरतात. त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले असून डास निर्माण झाले आहेत.

- राजेश जाधव, रुपीनगर

पावसामुळे डांबरीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे खडी, मुरूम, कॉंक्रिट, पेव्हिंग ब्लॉक, जीएसबी, कोल्डमिस्क वापरून खड्डे बुजविले जातात. पावसाळा संपल्यानंतर सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार आहे. उर्वरित खड्डे देखील लवकरच बुजवले जातील.

- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका