Khadki Tendernama
पुणे

PCMC : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निर्णयामुळे पीसीएमसीची का वाढली डोकेदुखी?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : गेल्या तीन वर्षांपासून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरात जमा होणारा कचरा महापालिकेच्या मोशी डेपोत टाकण्यात येत होता. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून खडकी बोर्डाकडून कासारवाडीत कचरा डेपोत पुन्हा कचरा टाकण्यास सुरूवात केली आहे. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता जेसीबीच्या साह्याने कचऱ्याचे ढीग केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा संत तुकारामनगर येथील कलासागर हॉटेलमागील बोर्डाच्या मालकीच्या डेपोत जमा केला जातो. याठिकाणी या कचरा डेपो व सुखवानी कॅम्पस सोसायटी यांची सीमाभिंत एकच आहे. कचऱ्याच्या ढिगापासून ७० ते ८० फूट अंतरावरच आठशे सदनिका आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे.

विनाप्रकिया कचरा जमा केला जात असल्याने कचऱ्याला आग लागते. तसेच, कचऱ्याची दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. नागरिकांना दारे खिडक्या बंद करून घरात राहावे लागत आहे. सदनिकाधारकांना वारंवार डोकेदुखी आणि श्‍वसनाचे विकार होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी व विविध सामाजिक संस्थांनी महापालिकेकडे तसेच खासदारांकडे केली आहे.

फेडरेशनच्या वतीने वारंवार सूचित केल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त व खडकी बोर्ड सीईओ यांच्यात सात जून २०२२ रोजी कासारवाडी कचरा डेपोत कचरा न टाकण्याबाबत निर्णय झाला. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून महापालिकेच्या मोशी कचरा डेपोत यापुढे स्वखर्चाने कचरा टाकण्याचे ठरले.

तेव्हापासून खडकी बोर्डाकडून कासारवाडी कचरा डेपोत कचरा टाकणे बंद होते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून खडकी बोर्डाकडून कासारवाडीत कचरा डेपोत पुन्हा कचरा टाकण्यास सुरूवात केली आहे. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता जेसीबीच्या साह्याने कचऱ्याचे ढीग केले जात आहेत.

‘स्वच्छ भारत अभियान व घन कचरा व्यवस्थापन नियम’ २०१६ मधील तरतुदीनुसार ओला व सुका कचरा वर्गीकरण करावा. ओला कचरा खडकी कॉन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये जिरविण्यात यावा. सुका कचरा मोशी कचरा डेपोत पूर्वीप्रमाणे टाकण्यात यावा. संपूर्ण संत तुकारामनगर दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. कासारवाडी कचरा डेपोत कचरा टाकणे कायमस्वरूपी थांबवावे व साठविलेल्या कचऱ्याची शाश्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून झाल्यावर नवीन कचरा पुन्हा टाकू नये, अशी मागणी आहे.

कासारवाडी कचरा डेपोत खडकी कॅन्टोन्मेंटचा कचरा टाकला जात आहे. त्याची दुर्गंधीयुक्त वास या परिसरात पसरून सुखवानी कॅम्पसमधील आठशे फ्लॅटधारकांचे आरोग्यास धोक्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. याची गंभीर दखल संबंधित आरोग्य अधिकारी यांनी घ्यावी. या बाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला पत्र दिले आहे.
- किरण हातणकर, सदनिकाधारक, सुखवानी कॅम्पस सहकारी गृहरचना वल्लभनगर

कासारवाडी कचरा डेपोत खडकी कॅन्टोन्मेंटचा कचरा टाकण्यास मनाई केली होती. पण पुन्हा कचरा टाकण्याच्या तक्रारी येत असतील तर आम्ही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाशी बोलून घेण्यात येईल.
- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता पर्यावरण विभाग महापालिका