industry Tendernama
पुणे

PCMC : उद्योजक पिंपरी-चिंचवडपेक्षा 'या' गावाला का देताहेत पसंती?

टेंडरनामा ब्युरो

देहू (Dehu) : मुबलक पाणी, दळणवळणाची सोय आणि कमी भाडेदर या कारणांमुळे देहू नगरपंचायतीच्या हद्दीत गेल्या तीन वर्षांत नागरीकरणाबरोबरच लघु उद्योग क्षेत्राची झपाट्याने वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेपेक्षा (PCMC) कमी दरात उद्योगासाठी जागा उपलब्ध होत असल्याने चिखली, तळवडे ऐवजी उद्योजकांनी देहू नगरपंचायतीच्या हद्दीत व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे, स्थानिक युवक, महिलांना रोजगारही मिळत आहे.

देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील रिंग रोडच्या परिसरात गोदामांसाठी भले मोठे पत्र्यांचे शेड शेतकऱ्यांनी उभारले असून व्यावसायिकांना ते भाड्याने दिले आहेत. मात्र, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यास देहू नगरपंचायत प्रशासन कमी पडू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नागरी वस्तीत दररोज होणारा वीजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे.

एमआयडीसीतील कामगारांची पसंती

पिंपरी-चिंचवड शहराच्या विस्तारलेल्या क्षेत्रात अनेक गृहप्रकल्प झाले आहेत. मोशी, रावेत, चऱ्होली, पिंपळे निलख, पुनावळे, किवळे, वाकड या भागांचे झपाट्याने नागरीकरण झाले. त्यानंतर, शहराच्या भोवती तळवडे आयटी पार्क, चाकण, म्हाळुंगे एमआयडीतील कामगारांनी देहू आणि परिसरातील ग्रामीण भागांत राहण्यासाठी पसंती दिली. देहूतील शेतजमिनीवर अनेक गृहप्रकल्प उभारले गेले. त्यातच आता औद्योगिक क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे, देहूत आर्थिक सुबत्ता आली आहे.

स्थानिक युवक, महिलांना रोजगार

अल्प भूधारक शेतकरी शेती करण्याऐवजी शेतात गोदामे उभारून भाड्याने व्यावसायिकांना देत आहे. त्यामुळे, देहू नगरपंचायतीच्या हद्दीत नागरीकरणाबरोबर औद्योगिकरणातही वाढ होत असल्याचे सध्या चित्र आहे. महिला आणि स्थानिक युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत आहे.

काय आहे चित्र...

- पर्यावरण, मुबलक वृक्षवल्ली, बारमाही वाहणारी इंद्रायणी नदीचा परिसर

- नागरीकरणाबरोबर औद्योगिकीकरणात झपाट्याने वाढ

- दीडशेपेक्षा जास्त लघुउद्योजकांकडून व्यवसाय चालू

- नगरपंचायत असल्याने तांत्रिक अडचणी कमी, रिंग रोडमुळे दळणवळण सुलभ

- भविष्यात देहू ते देहूरोड पालखी मार्गाचे रुंदीकरण होण्याची अपेक्षा

- पुणे, मुंबई सारख्या महानगरांकडे जाण्यासाठी राष्ट्रीय मार्गावरील ठिकाण म्हणून देहूची ओळख

- पूर्वी साडेतीन हजार मिळकती होत्या. या मिळकतींची संख्या सुमारे पंधरा हजारांवर.

देहू परिसरात विधानसभा निवडणुकीनंतर सर्वेक्षण करणार आहोत. सध्या फार कमी जणांनी नगरपंचायतीकडे सुविधांसाठी अर्ज केलेला आहे. संपूर्ण परिसराचा सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. नवीन योजनेमधून त्यांना पाणी पुरवठा केला येईल.

- निवेदिता घारगे, मुख्याधिकारी, देहू नगरपंचायत