CCTV Camera Tendernama
पुणे

PCMC: CCTV कॅमेऱ्यांबाबत महापालिकेला जाग; लवकरच टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : शहरातील महापालिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने विद्युत विभागामार्फत ८८ शाळांच्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानुसार, त्यातील १०५ शाळांमध्ये एकूण २६१ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या ८८ शाळा इमारती असून त्या इमारतींमध्ये प्राथमिक विभागाच्या १०५ आणि माध्यमिक विभागाच्या १८ शाळा भरतात. त्यात सुमारे ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटना पाहता विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे झाले आहे.

विद्यार्थी, कर्मचारी यांच्या प्रत्येक संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत केले जाते. पण, अनेक शाळांमधील कॅमेरे बंद आहेत. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या देखील कमी आहे.

सर्वेक्षणात काय आढळले ?

अनेक शाळांमध्ये प्रत्येकी तीन तर काही शाळांमध्ये प्रत्येकी चार कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातील एक कॅमेरा मुख्याध्यापकांच्या दालनात बसविण्यात आलेला आहे; तर उर्वरित दोन कॅमेरे हे क्रीडांगण आणि व्हरांड्यात लावण्यात आलेले आहेत. पण, हे कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. काही शाळांच्या परिसराची व्याप्ती पाहता कॅमेऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून आले. मुलींच्या स्वच्‍छतागृहांच्या परिसरात सीसीटीव्हीची आवश्‍यकता असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.

सध्या महापालिका शाळांमध्ये ५८१ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. विद्युत विभागाने केलेल्या सर्वेक्षणात २६१ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिका शाळांमध्ये होणाऱ्या प्रत्येक घटना- घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर ठेवणे शक्य होईल.
- विजय थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

विद्युत विभागाने केलेल्या सर्वेक्षणात २६१ ठिकाणे आम्ही शोधली आहे. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज असल्याचे निष्‍पन्न झाले आहे. याबाबत शिक्षण विभागाला माहिती दिली आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
- संजय खाबडे, सहशहर अभियंता, विद्युत विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका