BRT Pune Tendernama
पुणे

PCMC : जलद प्रवासासाठीच्या बीआरटीएस मार्गात ‘शॉर्टकट’ ठरतोय जीवघेणा

टेंडरनामा ब्युरो

आकुर्डी (Akurdi) : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महत्वाच्या भागांना जोडणाऱ्या व प्रवाशांना जलद गतीने प्रवास घडविणाऱ्या बीआरटीएस मार्गात ‘शॉर्टकट’ साठी दुचाकीस्वारांप्रमाणे आता पादचारी विद्यार्थी आणि प्रवाशांची घुसखोरी जीवघेणी ठरू पाहत आहे. त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

शहरातील बहुतेक भागांत पीएमपीची बीआरटीएस योजना सुरू आहे. या बीआरटीएस मार्गामुळे अनेक ठिकाणची वाहतूक कोंडी टाळून हजारो विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार जलद व सुखकर प्रवास घडत आहे. या बीआरटीएस मार्गावरील पीएमपी बसचा हजारो प्रवासी अवलंब करत आहेत. मात्र, दुचाकी वाहन चालकांप्रमाणे आता प्रवाशांचीही घुसखोरी जीवघेणी ठरू पाहत आहे. त्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.

जीव धोक्यात घालण्याचा प्रकार

बीआरटीएस बस स्थानकात ये-जा करण्यासाठी मार्गाच्या मधोमध रॅम्प करण्यात आले आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणी हा रॅम्प आणि स्थानक लांब पडत असल्याने अनेक विद्यार्थी व प्रवासी जीव धोक्यात घालून थेट बीआरटीएस मार्गातूनच इच्छित स्थानक गाठत आहेत.

हा प्रकार चालकाच्या लक्षात न आल्यास प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची भीती असल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराला पायबंद बसणे गरजेचे आहे. आकुर्डीकडून निगडीकडे जाताना प्रवाशांना बीआरटीएस मार्गातून बाहेर पडण्यासाठी रॅम्प हा उजव्या हाताच्या बाजूला सेवा रस्त्याकडे आहे. परंतु, त्या मार्गाचा वापर न करता खंडोबा चौकातून विद्यार्थी आणि प्रवासी बीआरटीएस मार्गातून जीवघेणा प्रवास करत आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षतेचा विचार करून बीआरटीएस बस थांब्यातून बाहेर पडण्यासाठी रॅम्प हे उजव्या हाताकडून सेवा रस्त्याकडे जाण्यासाठी दिले आहेत. त्याचा वापर त्यांनी करावा. जर अचानक कोणी दिसले; तर आम्हाला बस थांबावता येणे अवघड होते. त्यामुळे, नक्कीच अपघात होऊ शकतो.

- एक चालक, पीएमपी, ई-बस

बीआरटीएस मार्गावर बाहेर पडण्यासाठी रॅम्प दिले आहेत. त्याच मार्गाचा वापर प्रवाशांनी करावा. काही दिवसांनी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील नेमण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व बसथांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे देखील चालू करण्यात येणार आहे.

- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक

दापोडी-निगडी असुविधांचा मार्ग

दापोडी ते निगडीपर्यंतच्या बीआरटी मार्गवर अनेक असुविधांचा देखील सामना प्रवाशांना करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी बसथांब्यांवर वीजेची व्यवस्था नसल्याने सर्वत्र काळोख पसरलेला असतो; तर कुठे सीसीटीव्ही कॅमेरे बंद तर कुठे सीसीटीव्ही कॅमेरे गायब असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत दिसून आले. त्याकडेही लक्ष गरजेचे झाले आहे.