pmrda Tendernama
पुणे

PCMC : पीएमआरडीएचे 'ते' टेंडर बीव्हीजीकडे; १५ ऑक्‍टोबरपासून...

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : ‘पीएमआरडीए’च्‍या (PMRDA) अंतर्गत २४४ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. नव्‍याने मागविलेल्‍या टेंडरमध्ये (Tender) बीव्‍हीजीला (BVG) हे काम प्राप्‍त झाले आहे. त्‍यांच्‍यामार्फत ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. १५ ऑक्‍टोबरपासून बीव्‍हीजीला हे काम मिळाले असल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पीएमआरडीएमधील भरती प्रक्रिया टेंडरमध्ये अडकून पडली होती. मध्यंतरी या जुन्‍या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा दर्जा नसल्याने सध्या असलेला कंत्राटी कर्मचारी कंपनीचा ठेका काढून घेतला होता. त्यानुसार नव्या कंपन्यांकडून टेंडर मागविण्यात आले होते.

या टेंडर ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिकदृष्ट्या खुल्या केल्या होत्या. मात्र, तीनपैकी दोन कंपन्यांनी नमूद केलेल्या अटींची पूर्तता न केल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्‍यामुळे पुन्हा नव्याने टेंडर मागविण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. परिणामी, पुन्हा जुन्या कंपनीला दहा दिवसांची मुदतवाढ दिली होती.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी कामाची मुदत संपल्यानंतर नवीन प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार वेगवेगळ्या तीन कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले होते. ऑक्टोबर महिन्यात दाखल झालेल्‍या या प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली.

‘पीएमआरडी’कडून प्रशासनाकडून नमूद केलेल्या अटींची पूर्तता झाली नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी, तीनपैकी दोन कंपन्यांचे टेंडर रद्द झाले असून, पुन्हा नव्याने प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानुसार बीव्‍हीजीने प्रस्‍ताव दाखल केला होता. अटी शर्तींची पूर्तता केल्‍यानंतर १५ ऑक्‍टोबरपासून कंपनीला काम प्राप्‍त झाले असून, एक वर्षांसाठी त्‍यांना मुदत असणार आहे.

आवश्‍यकतेनुसार होणार भरती

वर्ग तीन आणि चारच्‍या पदांबाबतची माहिती पीएमआरडीए प्रशासन खासगी कंपनीला कळविणार आहे. त्‍यानंतर आवश्‍यकतेनुसार ही कंपनी उमेदवारांच्‍या मुलाखती घेऊन निवड करणार आहे. त्‍यांच्‍या कागदपत्रांची पडताळणी ‘पीएमआरडीए’कडून केली जाणार आहे. त्‍यानंतर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्‍त केले जातील, अशी माहिती प्रशासनाने दिली.

‘पीएमआरडीए’कडून २४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नव्‍याने टेंडर मागविण्यात आले होते. त्‍यामध्ये बीव्‍हीजी पात्र ठरली आहे. १५ ऑक्‍टोबरपासून त्‍यांच्‍या कामाला सुरूवात झाली आहे. आवश्‍यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. ‍

- सुनील पांढरे, सहआयुक्‍त, प्रशासन विभाग