PCMC Tendernama
पुणे

PCMC: पिंपळे सौदागरमधील वाहतूक कोंडी फुटणार; पालिकेचा काय आहे प्लॅन?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपळे सौदागरमधील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक (कुणाल आयकॉन रोड) रस्त्याला आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी नुकत्याच झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. ५५ कोटी रुपयांच्या मंजूर रकमेसह तेथील रस्त्यांचे १८ मीटर आणि १२ मीटर रुंदीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे, पिंपळे सौदागरमधील वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने आणखी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

कुणाल आयकॉन रस्ता हा वाकड ते नाशिक फाटा रोड आणि जुन्या मुंबई-पुणे आणि मुंबई-बंगळूर महामार्गांसह प्रमुख मार्गांना जोडतो. त्यामुळे, हा शहरातील एक महत्वाचा मार्ग ठरला आहे.

या रस्त्याच्या रुंदीकरणास आणि आधुनिकीकरणाच्या अंमलबजावणीला लवकरच सुरूवात होणार असून ३० महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण करण्यावर महापालिका भर देणार आहे. पिंपळे सौदागर सारख्या वेगाने वाढणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे.

शिवार चौक ते गोविंद गार्डन (कुणाल आयकॉन रोड) रस्त्याच्या विकासामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. रहिवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव घेता येईल. या रस्त्याचे अर्बन डिझाईननुसार आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याने पादचारी, सायकलस्वार तसेच अबालवृद्ध नागरिकांसाठी एक सुरक्षित रस्ता तयार करण्यावर महापालिका भर देणार आहे. नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन असे पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये -

प्रकल्पाची किंमत : ५५ कोटी रुपये (प्रशासकीय मान्यता)

टेंडर रक्कम : ४२.४३ कोटी रुपये

टेंडर स्वीकृती रक्कम : ३३.६७ कोटी रुपये

प्रकल्पाची मुदत : ३० महिने

निधी स्त्रोत : अर्बन ट्रान्सपोर्ट फंड (युटीएफ)

असा आहे प्रकल्प

- रस्त्याचे १८ व १२ मीटर रुंदीकरण

- पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर बांधकाम

- नियोजित पार्किंगसाठी स्वतंत्र जागा

- पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वहन नलिका

- पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि ओएफसीसाठी स्वतंत्र वाहिन्या

- पथदिवे आणि मार्गदर्शक फलकांची सुविधा

प्रकल्पाचे फायदे

- प्रवाशांच्या वेळ व इंधनाची बचत

- पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपथ

- पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती

- वायू प्रदूषण कमी होण्यास मदत