PCMC Tendernama
पुणे

PCMC : 'या' झोपडपट्ट्यांसाठी चांगली बातमी! लवकरच प्रत्येक घराला मिळणार...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : झोपडपट्ट्यांमधील पायाभूत नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे पुरविण्यासाठी माहिती संकलित केली जात आहे. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी गवळी माथा वसाहतीत उपक्रमाचे औपचारिक उद्‍घाटन केले. वस्त्यांमधील प्रत्येक घराला ‘गुगल प्लस कोड’ देणे व त्यांच्या शाश्वत विकासासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.

महापालिका झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग आणि शेल्टर असोसिएट्स यांच्यातर्फे आठ झोपडपट्ट्यांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पायाभूत सेवासुविधा अधिक सक्षमपणे उभारणे, नागरिकांना वैयक्तिक शौचालयाची उभारणी करणे, जलःनिसारण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, आरोग्य वैद्यकीय सेवा, अभ्यासिका असे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

सर्वेक्षण उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, उपअभियंता मोहन खोंद्रे, शेल्टर असोसिएट्च्या प्रतिमा जोशी, महिला बचत गटाच्या मंगल वाडकर, संगीता कोळेकर, तानाजी दाते, क्षितिज रोकडे आदी उपस्थित होते. विष्णू भाट यांनी आभार मानले.

असा आहे उपक्रम
- जीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक घर क्रमांक देऊन कुटुंबाचे सर्वेक्षण करणे
- कुटुंबाची माहिती, घर व शौचालय स्थिती, कचरा व्यवस्थापन आदी माहिती संकलित करणे
- वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारणे, युवक व युवतींना तांत्रिक शिक्षण देणे, वैद्यकीय व आरोग्य सेवा देणे

पहिल्या टप्प्यात
रमाबाईनगर आकुर्डी, रामनगर आकुर्डी, गवळीमाथा भोसरी, संजय गांधीनगर मोशी, शांतिनगर भोसरी, शास्त्रीनगर पिंपरी, काटेवस्ती दापोडी, संजयनगर वाखारेवस्ती या आठ झोपडपट्ट्यांमध्ये शेल्टर असोसिएट्समार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे.