पुणे (Pune) : राज्यातील काही महापालिकांमध्ये पाणीपट्टी वसुली आणि मिळकतकर वसुलीचे एकत्रित कामकाज चालते. तोच कित्ता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने राबविण्याचा निर्णय घेतला.
पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी गेल्या सहा महिन्यांत सुमारे तीनशे नळजोड खंडित केले. त्यामुळे वर्षानुवर्षांच्या थकबाकीसह ३१ मार्चअखेर ७८ कोटी ५८ लाख रुपये विक्रमी पाणीपट्टी वसूल झाली. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम १५ कोटींनी अर्थात २७ टक्क्यांनी अधिक आहे.
शहरात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा एक लाख ७६ हजार अधिकृत नळजोडधारक आहेत. मात्र, अनेकांकडे वर्षानुवर्ष पाणीपट्टी थकीत आहे. ती वसुलीचे काम महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मिळकत करआकारणी व करसंकलन विभागाकडे सहा महिन्यांपूर्वी दिली.
या विभागाने मिळकतकर वसुलीचाच फंडा पाणीपट्टी वसुलीसाठी वापरला. थकबाकीदार मिळकतधारकांना नोटीस देणे, मिळकती सील करणे, जप्त करणे, त्यानंतर लिलाव करणे अशी कारवाई केली जात आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी नळजोड खंडित करण्याचा निर्णय करआकारणी व करसंकलन विभागाने घेतला आणि कार्यवाही सुरू केली.
अनेक वर्षांपासून पाणीपट्टी न भरणाऱ्या ३०० पेक्षा जास्त मिळकतधारकांचे नळजोड खंडित केले. मीटर निरीक्षकांना करसंकलन वसुली पथकाची साथ मिळाली. यामुळे तब्बल ७८ कोटी रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी वसूल झाली.
अशी वसूल झाली पाणीपट्टी
माध्यम / रक्कम (कोटी रुपयांत)
धनादेश / २४.४१
रोख /१९.२१
ऑनलाइन / २१.४३
बीबीपीएस / १३.३२
ॲप / ००.२१
एकूण / ७८.५८
यापूर्वीची पाणीपट्टी वसुली
वर्ष / वसूल रक्कम (कोटी रुपयांत)
२०१९-२० / ४२.९४
२०२०-२१ / ४१.८६
२०२१-२२ / ५४.९७
२०२२.२३ / ५७.६७
२०२३-२४ / ७८.५७
मिळकतकर आणि पाणीपट्टीबाबत एकत्रीकरण टेंडर प्रक्रिया चालू आहे. यामुळे नागरिकांना दोन्ही कर एकत्रित भरणे शक्य होणार असून, महापालिकेचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. महापालिकेची पाणीपुरवठा स्कॅडा सिस्टिम शेवटपर्यंत म्हणजे नळजोडपर्यंत वापरता येईल का, याचा विचार चालू आहे. त्यामुळे पाणी व महसूल गळतीचा ताळमेळ घालणे शक्य होईल. पाणीपुरवठा सेवेचा दर्जा वाढवण्यास मदत होईल.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
पाणीपट्टी आणि मिळकतकर वसुली एकाच विभागाकडे सोपवण्याचा निर्णय अवघड होता. पण, करसंकलन विभागातील कर्मचारी आणि मीटर निरीक्षक यांच्या माध्यमातून दोन्ही करांची रक्कम वसूल करता आली. महापालिकेचे विविध महसूल स्रोत एकत्रित करण्याचा विचार आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई निरंतर स्वरूपात चालू राहणार आहे. अवैध नळजोड खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका