Eknath Shinde Tendernama
पुणे

PCMC : 'बहिणाबाई'साठी आता 24 कोटींचे टेंडर; आणखी वर्षभर...

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी चिंचवड महापालिकेचे (PCMC) संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या नावाखाली आठ वर्षांपासून बंद आहे. आतापर्यंत त्यावर २० कोटी रुपये खर्च केले आहेत. आता सुशोभीकरणासाठी आणखी २४ कोटी रुपयांचे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आठ वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद असलेल्या संग्रहालयास आणखी वर्षभर टाळे राहणार आहे.

प्राणी संग्रहालयासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सर्पोद्यान व प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. २० कोटी रुपये खर्च करून आणि आठ वर्षे काम करूनही प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले नसून, संग्रहालयास टाळे आहे.

या कामात गैरव्यवहार झाल्याचा आणि अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे ३६ प्राणी, पक्षांचा मृत्यू झाल्याचा आरोप डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे (एफडीसीएम) हस्तांतरित करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. महामंडळाने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार या प्राणिसंग्रहालयाचे काम लवकरात लवकर सुरु करून ते पूर्ण करावे, पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, त्याप्रमाणे सेवा-सुविधा निर्माण करण्याबाबत सूचना केली आहे.

त्यामुळे महापालिकेने जुने टेंडर रद्द केले. संग्रहालयासाठी एक तज्ज्ञ अधिकारी नियुक्त केला. सल्लागार बदलण्यात आला. आराखड्यात बदल व सुधारणा करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबविली. प्राणिसंग्रहालय सुशोभीकरणाच्या उर्वरित कामाची २४ कोटी दोन लाख १६ हजार ६८ रुपये खर्चाचे टेंडर स्थापत्य उद्यान विभागाने प्रसिद्ध केले आहे.