Indian Railways Tendernama
पुणे

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशी संतप्त; थेट रेल्वे गाडीच धरली रोखून

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आरक्षित व अनारक्षित डब्यांत प्रवाशांची तुडूंब गर्दी झाल्याने डब्यातील प्रवाशांनी पुणे स्थानक (Pune Railway Station) आल्यावर डब्याचे दरवाजे आतून उघडलेच नाही. त्यामुळे पुणे स्थानकावरच्या प्रवाशांना डब्यांत प्रवेश करता आला नाही. तेव्हा चिडलेले प्रवाशी रेल्वे निघताच पळत जाऊन ट्रकवरच उभे राहिले. त्यामुळे चालकाला रेल्वे थांबवावी लागली. डब्यांत चढू न शकणाऱ्या प्रवाशांनी सुमारे एक तास ४० मिनिटे रेल्वे थांबवून ठेवली. अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वे दौंडच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकली.


घटनेची माहिती आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. तसेच नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, आरपीएफचे सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार आदी स्थानकावर दाखल झाले. त्यांनी काही प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेतून जाण्यास परवानगी दिली. तर ६७ प्रवाशांना तिकिटाची पूर्ण रक्कम परत दिली. त्यानंतर पहाटे दोन वाजून ४८ मिनिटांनी रेल्वे मार्गस्थ झाली.

नेमके काय झाले?
- मुंबई-बिदर एक्स्प्रेस मुंबईहून निघतानाच कुर्डुवाडी, लातूर जाणाऱ्या प्रवाशांनी भरून गेली
- अनेक अनारक्षित तिकीटधारक आरक्षित डब्यांत घुसले
- त्यामुळे आरक्षित व अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गर्दी झाली
- पिंपरी स्थानकावर देखील अशीच परिस्थिती होती
- पुणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच वर रविवारी पहाटे एक वाजून आठ मिनिटांनी बिदर एक्स्प्रेस दाखल
- रेल्वेने प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे दोनशे होती
- फलाटावर दाखल झाल्यावर डब्यांचे दरवाजे उघडत नसल्याने प्रवाशांकडून गोंधळ घालण्यास सुरवात झाली
- डब्यांत प्रवेश करता येत नसल्याने प्रवासी आक्रमक बनले
- रेल्वेला सिग्नल मिळताच सुमारे शंभर प्रवासी रेल्वे थांबविण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रकवर उभे राहिले
- तेव्हा चालकाने रेल्वे थांबवली

मुंबई-बिदर एक्स्प्रेसला प्रवाशांची मोठी गर्दी होती. काही प्रवाशांनी डब्यांत आणखी गर्दी होऊ नये म्हणून डब्यांचे दरवाजे आतून बंद केले. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे थांबवली. अशा प्रवाशांची सोय दुसऱ्या रेल्वेत केली, तर काहींनी प्रवास करण्याचे टाळले. त्यांना तिकिटाची पूर्ण रक्कम देण्यात आली.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे