पुणे (Pune) : मोठा गाजावाजा करून चांदणी चौकातील उड्डाणपूल (Chandni Chowk Flyover) पाडण्यात आला. त्यानंतर काम गतीने होऊन प्रवासी व वाहन चालकांची कोंडीतून सुटका होईल असे वाटले होते. पण कामाची गती व इतर तांत्रिक बाबी पाहता चांदणी चौकातील चक्रव्यूहातून लवकर सुटका होईल असे वाटत नाही.
मागील अनेक महिन्यांपासून चांदणी चौक येथे बहुमजली उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांना खड्डे, खडी, वाहतूक कोंडी, वाहनांचा धूर, मातीचा धुरळा आणि धोक्याचे वळण यांचा सामना करत जावे लागते. अपघातास कारणीभूत होऊ शकणारे हे सापळे जागोजागी दिसत आहे. त्यामुळे चांदणी चौकाचे रडगाणे आणखी किती दिवस ऐकावे लागणार हे सांगता येत नाही.
चांदणी चौकातून कोथरूडकडे जाताना तीव्र उतार आहे. येथे पादचाऱ्यांसाठी पदपथ नाही. त्यामुळे या मार्गाने खाली येणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन यावे लागते. येथे काही गाड्या मुंबईकडे जाण्यासाठी वळतात तेव्हा उताराने येणाऱ्या गाड्यांना थांबावे लागते. कोथरूडकडून चढाकडे जाणाऱ्या गाड्याही थांबतात. पौडकडून बावधन, कोथरूडकडे जाणाऱ्या उतारावर छोटे खड्डे व पसरलेली खडी यामुळे दुचाकी घसरतात. मुंबई व पौडच्या बाजूने आलेल्या गाड्या बावधनकडे वळतात तेव्हा कोथरूड, वारजेच्या बाजूला जाणाऱ्या वाहनांना अडथळा तयार होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मुख्य चौकात उभे असलेल्या पोलिसांना वाहने मार्गी लावण्या बरोबरच प्रवाशांना आवरण्याकडेही लक्ष द्यावे लागते.
चांदणी चौक बसथांब्यावर प्रवाशांना जीव मुठीत धरूनच थांबावे लागते. येथे रस्ता अरुंद व वाहनांची संख्या जास्त अशी स्थिती आहे. येथे मोठा खड्डा असल्याने वाहनांचा वेग आपोआप मंदावतो. तरीही एखादी वेगातील पण खड्ड्यांचा अंदाज न आलेली गाडी पुढील गाडीला धडकण्याचे प्रसंग येथे नियमित घडतात असे हरिभाऊ सणस यांनी सांगितले. सणस म्हणाले की, पौड, मुळशीकडे जाताना वा मुंबई, मुळशीवरून येताना जे बस थांबे आहेत त्यासाठी कोणतीही सुविधा, निवारा नाही. धुरळ्याचा त्रास सहन करत बसची वाट पहावी लागते. बसमधून उतरताना मागून येणारी गाडी आपल्याला उडवणार नाही ना याचीही काळजी घ्यावी लागते.
सेवा रस्ता पूर्ण झालेला नाही, जुना पूल पाडला तेथे अजूनही बरेच
काम बाकी आहे. त्यामुळे येथे वाहतूक मंद गतीने होते. अनेकदा संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
- मंगेश नारखेडकर, रहिवासी, झिनीया सोसायटी
वेदभवन जागे संदर्भात न्यायालयात खटला दाखल असल्याने आता तेथे कोणतेही काम करता येत नाही. जर इतर कुठे खड्डे वा खडी पडली असेल तर तेथे तातडीने काम केले जाईल.
- भारत तोडकरी, प्रकल्प सल्लागार, चांदणी चौक