Traffic  Tendernama
पुणे

Old Mumbai Pune Road: 'या' ठिकाणची कोंडी अखेर फूटली

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : जुना पुणे-मुंबई रस्ता (Old Mumbai Pune Road) रुंदीकरणास अनेक वर्षांपासून अडथळा ठरत असणाऱ्या बोपोडी (Bopodo) येथील एका इमारतीसह ६३ घरांवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या पथकाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात केलेल्या कारवाईमध्ये घरे पाडून रस्ता रुंदीकरणामधील अडथळा दूर करण्यात आला. कारवाई झालेल्या घरमालकांचे यापूर्वीच नुकसान भरपाईसह पुनर्वसन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हॅरिस पुलापर्यंतचे पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी झालेले आहे. मात्र पुणे महापालिकेच्या हद्दीत बोपोडी येथे काही घरे, इमारती रस्ते रुंदीकरणाच्या कारवाईमध्ये अडथळा ठरत होती. परिणामी संबंधित ठिकाणावर रस्ता अरुंद होऊन वाहतुकीचा वेग मंदावत होता. ऐन रहदारीच्यावेळी बोपोडी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.

या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी प्रयत्न केला जात असतानाच पर्यायी घरे, नुकसान भरपाई अशी वेगवेगळी कारणे पुढे करून काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या भूसंपादनासाठी विलंब झाला होता.दरम्यान, महापालिका प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी सकाळी सात वाजता मोठ्या पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाईला सुरुवात झाली.

चौकातील दुमजली इमारतीसह लगतच्या ६३ मिळकती जमीनदोस्त केल्या. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. या कारवाईमध्ये साडेचार हजार चौरस मीटर जागा ताब्यात घेतली.

भूसंपादनाची कारवाई सुरु असतानाच रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही प्राधान्य देण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.

- विकास ढाकणे,अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका