Pragati Express Tendernama
पुणे

आता 'प्रगती एक्स्प्रेस'मधूनही दिसणार 'झाडी...डोंगार..! कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील प्रगती एक्स्प्रेसमध्येही (Pragati Express Train) आता विस्टाडोम कोच सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा २५ जुलैपासून प्रवाशांना उपलब्ध होणार असून २० जुलैपासून या गाडीचे आरक्षण खुले होईल.

प्रगती एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेकडे आता एकूण चार गाड्यांत विस्टाडोम कोच असेल. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन या गाड्यांत विस्टाडोम कोच या पूर्वीच बसविण्यात आले आहेत. पुणे-मुंबई मार्गावरील घाटातील निसर्ग सौदर्य विस्टाडोम कोचमुळे प्रवाशांना पाहण्याची संधी मिळणार आहे. या कोचला काचेच्या खिडक्या असतील.

हे लक्षात ठेवा
- प्रगती एक्सप्रेस (क्र. १२१२५) २५ जुलैपासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सायंकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी सुटेल
- पुण्यात सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी पोचेल
- पुण्यावरून ही गाडी (क्र. १२१२६) २५ जुलैपासून दररोज सकाळी ०७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल
- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पोचेल
- दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा स्थानकांवर थांबे
- एक विस्टाडोम कोच, एक वातानुकूलित चेअर कार
- ११ द्वितीय श्रेणी चेअर कार (५ पूर्णपणे आरक्षित, ४ अनारक्षित, एक मासिक तिकीटधारकांसाठी आणि एक महिला कोच-महिला मासिक तिकीटधारकांसाठी ५४ जागा आणि महिलांसाठी ५४ राखीव जागा)
- विस्टाडोम कोच वातानुकूल असून त्याचे भाडे ९७५ रुपये