Nitin Gadkari Tendernama
पुणे

Nitin Gadkari News : चाकणकरांना लवकरच मिळणार गुड न्यूज... काय म्हणाले नितीन गडकरी?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गाची (Pune Nashik National Highway) टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू असून, त्याबरोबर तळेगाव-चाकण-शिक्रापूर (Talegaon - Chakan - Shikrapur Highway) या मार्गाच्या कामाची ही टेंडर प्रक्रिया सुरू आहे. याच्या निधी उपलब्धतेसाठी पंतप्रधान कार्यालयामध्ये (PMO) फाइल मंजुरीसाठी गेली आहे.

सुमारे आठ हजार चारशे कोटींचे पुणे- नाशिक महामार्गाचे; तर तळेगाव- चाकण- शिक्रापूर मार्गाचे आठ हजार कोटींचे काम आहे. पुणे- नाशिक महामार्गाचे काम लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

पुणे- नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी महामार्गाच्या प्रलंबीत कामाबाबत गडकरी यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळासमवेत भेट घेतली.

चाकण (ता. खेड) येथील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या कामामुळे वाहतूक कोंडीने नागरिक, उद्योजक, कामगार त्रस्त झालेले आहेत. तसेच, औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या, उद्योग स्थलांतरित होण्याची भीती आहे.

त्यामुळे महामार्गाचे काम तातडीने व्हावे, अशी मागणी मेदगे यांनी गडकरी यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी पुणे- नाशिक महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.

खेड, मंचर, नारायणगाव व आळेफाटा या बाह्यवळणाच्या उर्वरित कामाला लवकरच मान्यता देणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. दरम्यान, गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यामुळे मेदगे यांनी त्यांचा सत्कार केला.