पुणे (Pune) : रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांच्या कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये रेल्वेचे अधिकारी आणि खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. प्रत्येक प्रश्नावर अधिकाऱ्यांची नकारघंटा ऐकून संतापलेले सर्वच्या सर्व नऊ खासदार बैठकीतून बाहेर पडले. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तडकाफडकी अध्यक्षपदाचा राजिनामा दिला. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासन व खासदार यांची मंगळवारी पुणे डीआरएम कार्यालयात आयोजित केलेली बैठक वादळी ठरली. दोन वर्षांपासून मतदार संघातील प्रवाशांच्या मांडलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात कोणताच निर्णय झाला नाही. दरवेळेस केवळ चर्चा होतात, कृती नाही. आमच्या प्रश्नांना जर गंभीरपणे घेणार नसाल तर आम्हाला तुमच्या बैठकीत सहभाग घेण्यास रस नसल्याचे सांगत नऊ खासदार बैठकीतून बाहेर पडले. तसेच येथून पुढे रेल्वेच्या कोणत्याही बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या संदर्भात पीएमओ व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता. २०) मध्य रेल्वेचे सर व्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व सोलापूर विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या खासदारांची बैठक झाली. यावेळी नऊ खासदार उपस्थित होते. रेल्वे अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाही. खासदारांचे मत विचारत घेतले जाणार नसेल तर आम्ही रेल्वेच्या बैठकीवर बहिष्कार घालू, अशी भूमिका सर्व खासदारांनी घेतली. या बैठकीला रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, धैर्यशील माने, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवन राजे निंबाळकर, सुधाकर श्रृंगारे व उमेश जाधव आदी खासदार उपस्थित होते.
तीन महिन्यांपूर्वी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुणे डीआरएम कार्यालयात रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी पुण्याच्या अधिकाऱ्यांनी दानवे यांना अपुरी उत्तरे दिली होती. त्यावेळी दानवे यांनी बैठकीतच त्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. बैठकीला केवळ चहा बिस्किटे खाण्यासाठी येतात का?, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला होता.
'त्या' मुलींच्या शिक्षणाचे काय?
माझ्या मतदार संघातील केम व जेऊर स्थानकावर पूर्वी पॅसेंजर दर्जाच्या रेल्वेला थांबा होता. तो आता रद्द झाल्यामुळे सुमारे १५० मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे पालक रेल्वे नसल्याने दुसऱ्या वाहनाने महाविद्यालयाला जाण्यास विरोध करीत आहे. हा प्रश्न माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मांडला. मात्र, पॅसेंजर रेल्वेला मिळणारे उत्पन्न कमी असल्याचे सांगून पुन्हा थांबा देता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त करून बैठकीतून बाहेर पडले. हे पाहून उर्वरित सर्व खासदार बैठकीवर बहिष्कार घालून बाहेर पडले.
मतदारसंघातील प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने वारंवार सांगूनही रेल्वे अधिकारी त्याची दखल घेत नाही. मंगळवारच्या बैठकीतही पुन्हा याचा प्रत्यय आला. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहण्यात काही अर्थ नव्हता. खासदारांच्या विभागीय रेल्वेच्या समितीच्या अध्यक्ष पदाचा देखील मी राजीनामा दिला.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार