तळेगाव स्टेशन (Talegaon Station) : अस्तित्वातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी सात कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध झाला असून, भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) उन्नत महामार्गाच्या कामाचे टेंडर (Tender) प्रक्रिया चालू असल्याची माहिती तांत्रिक महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी दिली.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, सचिव अमित प्रभावळकर, सदस्य संजय चव्हाण सचिन गाडे आदींनी गुरुवारी (ता. २२) पुण्यातील वारजे येथील भारतीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन तांत्रिक महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक एस. एस. कदम आणि तांत्रिक उपव्यवस्थापक पंकज प्रसाद यांची भेट घेतली.
प्रलंबित तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कामासंदर्भात माहिती घेतली. नाशिक फाटा ते खेड उन्नत महामार्गाचे काम मार्गी लागले असले तरी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत अद्याप कुणीही गांभीर्याने घायला तयार नाही. मावळ आणि शिरूर लोकसभेच्या खासदारांसह खेड, मावळच्या आमदारांची इच्छाशक्ती कमी पडत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. या कामाच्या पाठपुराव्यासाठी केवळ कृती समिती लढा देत आहे.
कृती समितीच्या सदस्यांशी झालेल्या चर्चेत प्रकल्प संचालक एस. एस. कदम म्हणाले, ‘‘तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामासाठी भूसंपादनाचा प्रश्न सोडवावा लागेल. प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्गाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉर कामाची जवळपास पाच हजार कोटींहून अधिक किमतीची टेंडर प्रक्रिया चालू आहे.
राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हा रस्ता हस्तांतरित करण्यासंदर्भात चर्चा असल्या तरी अद्याप याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. तळेगाव-चाकण दरम्यान रस्त्याकडेच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानांसमोर भराव टाकून अतिक्रमणे केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या आहे.
ही कामेही होणार
- सध्या होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनेअंतर्गत अस्तित्वातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे काम राजमार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे
- धोकादायक वळणे सुरळीत करणे, बाजूपट्ट्या, गटारी, मोऱ्यांची कामे
- रस्त्यावरील वीजवाहक तारांचे खांब हटविणे
- आवश्यक तेथे रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम