Road Tendernama
पुणे

Pune-Satara महामार्ग होणार खड्डेमुक्त; NHAI कडून ‘जिओपॉलिमर काँक्रीट’ रसायनाचा वापर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे. यासाठी पहिल्यांदाच ‘जिओपॉलिमर काँक्रीट’ या रसायनाचा वापर केला जात आहे. मुसळधार पावसातदेखील या रसायनाचा वापर करून खड्डे बुजविले जात आहेत. गुरुवारी पहिल्या दिवशी सुमारे ३० खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली.

पुणे शहर व जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गांचादेखील समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सध्या ‘जिओपॉलिमर काँक्रीट’ या रसायनाचा वापर केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-सातारा महामार्गावरदेखील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे.

असे भरले जातात खड्डे

पाऊस सुरू असल्यास खड्डे भरण्यासाठी सिमेंट, खडी, वाळू व कोल्ड मिक्सचा वापर केला जात आहे, तर पाऊस बंद झाल्यावर याच घटकात हॉट मिक्सचा वापर केला जातो, तर खड्डे बुजविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ‘जिओपॉलिमर काँक्रीट’चा वापर केला जात आहे. यातदेखील सिमेंट, खडी व वाळूचा वापर केला जात आहे.

चार पथके कार्यरत

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चार पथकांची निर्मिती केली आहे. एका पथकात दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक सतत खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. एक तासात एक खड्डा बुजवला जात आहे.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पहिल्यांदाच ‘जिओपॉलिमर काँक्रीट’चा वापर केला जात आहे. याचा दर्जा अत्यंत चांगला आहे. शिवाय खड्डे बुजविण्याचे काम वेगाने होत आहे. याद्वारे खड्डे बुजविल्यास किमान तीन ते चार वर्षे तरी त्या खड्ड्यांची डागडुजी करावी लागत नाही.

- अभिजित गायकवाड, पथ व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग विभाग