Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune : चांदणी चौकात अखेर उभारणार पादचारी पूल; टेंडर प्रक्रिया पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात लवकरच पादचारी मार्ग (फूट ओव्हर ब्रिज) उभारला जाणार असून, त्यासाठी टेंडर प्रक्रीया पूर्ण झाली आहे. चांदणी चौकातील ‘एसटी’चा नवीन बस थांबा ते इराणी कॅफे बावधन, असा १०० मीटरचा लोखंडी पादचारी मार्ग असणार आहे.

पादचारी मार्गाचे काम कोल्हापूर येथील ‘एमडी इंफ्र’ कंपनीला देण्यात आले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ‘एमडी इंफ्र’ यांच्यातील शेवटच्या टप्प्यातील कराराचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडून देण्यात आली.

दररोज हजारो प्रवाशांना स्वत:चा जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो. महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला जायचे असल्यास तीन किलोमीटर पायी जावे लागते; अन्यथा तीन किलोमीटर अंतरासाठी तब्बल १२० रुपये मोजून भाड्याने रिक्षा करून जावे लागते. पादचारी मार्ग झाल्यावर सुरक्षितरित्या पाच मिनिटांत महामार्ग ओलांडता येईल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयीतून सुटका होईल. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन तत्काळ पादचारी पूल उभारण्याची मागणी केली आहे.