IT Sector Tendernama
पुणे

IT: कायमस्वरुपी Work From Homeचा Trend; जाणून घ्या कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात कोरोना (Covid 19) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने आयटी कंपन्यांनी त्यांची कार्यालये सुरू केली आहेत. मात्र अनेकांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) सूट झाल्याने त्यांनी घरूनच कामाची इच्छा व्यक्त केली. तर काहींना कामावर यायचे आहे. त्यामुळे सध्या अनेक कंपन्या आठवड्यातील पाच दिवसांपैकी तीन दिवस आयटीयन्सना कामावर बोलावत आहे. तर दोन दिवस वर्क फ्रॉम होम दिले जात आहे. एकदम कामावर हजर होण्यापेक्षा हायब्रीड पद्धतीने काम सुरू असल्याने कर्मचारी या निर्णयावर खूष आहेत. पुन्हा ऑफिसमध्ये येऊन कामकाज सुरू झाल्याने ठरावीक ठिकाणी गर्दी दिसू लागली आहे. मात्र, आजही आयटी हबमधील (IT HUB) काही ठिकाणे ओस पडली आहेत. ५०० हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी सध्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलविणाऱ्यावर भर दिला आहे.

कोरोनाचे संकट आल्यानंतर सुमारे ९५ टक्के ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करणारे आयटीयन्स आता ऑफिसमध्ये येऊन काम करू लागले आहेत. शहरातील विविध आयटी हबमध्ये सध्या सुमारे ५० टक्के आयटीयन्स हे वर्क फ्रॉम होम तर उर्वरित ५० टक्के आयटीयन्स हे ऑफिसमध्ये येऊन काम करीत आहेत. येत्या काही दिवसांत सुमारे ६० टक्के आयटीयन्स ऑफिसमध्ये येऊन काम करू शकतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

छोट्या कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम
भाडेतत्त्वावर घेतलेल्या ऑफिसमध्ये कामकाज सुरू असलेल्यांचा आकडा मोठा आहे. यातील अनेक कंपन्या छोट्या किंवा मध्यम स्वरूपाच्या आहेत. कंपनीची उलाढाल, व्यवस्थापन खर्च आणि वार्षिक फायदा याचा विचार करता अनेक छोट्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचे धोरण कायम ठेवले आहे. त्यामुळे सर्व कंपन्यांचे भाडे, वीजबिल आणि सेटअपचा खर्च कमी झाला आहे.

वर्क फ्रॉम होमचे फायदे
१) कामाच्या ठिकाणी होणारा कोरोनाचा प्रसार रोखता येतो
२) ऑफिसचे भाडे वाचते
३) नवीन कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त जागा घ्यावी लागत नाही
४) पिकअप आणि ड्रॉप बंद झाला
५) वीजबिल कमी झाले
६) देखभालीचा खर्च वाचतो
७) अनेक कर्मचाऱ्यांची घरून काम करण्याला पसंती

कायम घरून काम करावे लागेल
काही छोट्या कंपन्यांनी कर्मचारी कामावर घेतानाच त्यांना कायमस्वरूपी घरून काम करावे लागेल, याची कल्पना देण्यास सुरवात केली आहे. मुलाखत घेताना आणि करार करताना ही बाब त्यात नमूद केली जात आहे. अशा प्रकारच्या नोकऱ्यांच्या शोधात असलेल्यांची संख्या वाढत आहे. मात्र अशा नोकऱ्यांची संधी अद्याप मर्यादित आहे. पुण्यात कुटुंब नसलेल्यांची या नोकऱ्यांना पसंती मिळत आहे.