पुणे (Pune) ः जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे (Old Mumbai Pune Road) रुंदीकरण करून खडकीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नव्याने टेंडर काढले जाणार आहे. या कामासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पिंपरीच्या हद्दीत दापोडीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, पण पुणे महापालिकेच्या हद्दीत लष्कराकडून खडकीतील २.१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी जागा दिली नव्हती. गेले अनेक वर्षे यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते. सध्या हा रस्ता अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) ४२ मीटर रुंदीचा रस्ता अपेक्षीत आहे. पण, सध्या हा रस्ता केवळ २१ मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
२०१५ पासून या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेकडून पाठपुरावा सुरू होता. २०१६ मध्ये याची निविदा काढली होती, पण रस्त्यासाठी जागाच ताब्यात नसल्याने काम होऊ शकले नव्हते. मात्र, आता सात वर्षानंतर लष्कराने ही जागा ताब्यात देण्याचा निर्णय घेतल्याने रस्त्याचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर या मार्गावर काही ठिकाणी खासगी जागा मालकांकडून जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. मोबदल्याची प्रक्रिया सुरू असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी घेतली जाणार आहे. तसेच, काहींनी टीडीआरच्या माध्यमातून नुकसानभरपाई घेण्याची तयारी दाखवली आहे, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, जुन्या मुंबई-पुणे रस्त्याचे काम करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी टेंडर काढले होते. परंतु, काम होऊ शकले नाही. गेल्या सहा वर्षांत या कामाचा खर्च वाढलेला आहे, तसेच सर्वच गोष्टींचे नव्याने मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्यामुळे फेर टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे.