पुणे (Pune) : पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण धावपट्टीच्या लँडिंग पॉइंट जवळ इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या इमारतीच्या उंचीमुळे विमानतळाच्या फनेल झोनमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे धावपट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामात बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. विमानतळाच्या धावपट्टीचा ‘ओएलएस’ (ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेस) सर्व्हेचा अहवाल नुकताच भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सादर झाला असून यातील ‘कार्टोग्राफी’त इमारतीचा अडथळा असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा ‘ओएलएस’ सर्व्हेचा अहवाल हा नुकताच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षांकडे सादर झाला आहे. सुरुवातीला हा अहवाल सकारात्मक असल्याचे बोलले जात होते. मात्र अहवाल सादर झाल्यावर काही बाबी उघड झाल्या आहेत. यात धावपट्टी वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या ‘कार्टोग्राफी’त धावपट्टीच्या पूर्वेस इमारत अडथळा ठरत असल्याचे म्हटले आहे.
तर इमारतीचा मजला पाडावा लागणार
धावपट्टीच्या फनेल झोनमध्ये विशेषतः पूर्वेस मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. ‘कार्टोग्राफी’त उल्लेख केलेल्या इमारतीचा एखादा मजला जरी वाढला असेल तरी विमानाचे लँडिंग धोक्यात येण्याची शक्यता आहे. ‘ओएलएस’ अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित इमारतीने किती मजल्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते. प्रत्यक्षात किती मजले बांधण्यात आले. याची पाहणी करून नियमबाह्य मजला असेल तर तो पाडावा लागणार आहे.
अशी आहे धावपट्टी
१) सद्यःस्थितीत धावपट्टीची लांबी २५३५ मीटर (आठ हजार ३१६ फूट) इतकी आहे. तर रुंदी ४५ मीटर आहे
२) धावपट्टीच्या पूर्वेच्या बाजूला ५०० मीटर व पश्चिमेला ३०० मीटर जागेची आवश्यकता
३) सुमारे ८०० मीटरने धावपट्टी वाढली तर पुणे विमानतळाची धावपट्टीची लांबी सुमारे १० हजार ९४० फूट इतकी होणार
४) सुमारे ११ हजार फूट धावपट्टी झाल्यास मोठी विमाने देखील पुणे विमानतळावर उतरू शकतील
५) जागेच्या संपादनासाठी सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित
‘ओएलएस’ अहवाल पारदर्शकपणे समोर आला पाहिजे. नियमांचे उल्लंघन करून कोणी बांधकाम केले असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होणे गरजेचे आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ