Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune : चांदणी चौकातील नव्या पादचारी पुलाला मंजुरी; मुंबईला जाणे होणार सोपे, सुरक्षित

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौक येथून मुंबईला जाणे आता सोपे व सुरक्षित होणार आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नव्या पादचारी पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्चून ११० मीटर लांबीचा व ६.६ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. पाषाण ते मुंबईच्या दिशेने असलेला बसथांबा या दरम्यान हा पूल उभारण्यात येणार असून, या महिन्याच्या अखेरीस पुलाच्या कामास सुरुवात होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ८६५ कोटी रुपये खर्चून चांदणी चौकात आठ रॅम्प सह मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. परिणामी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला आहे. चांदणी चौकात रस्त्याचे काम होण्यापूर्वी दररोज या रस्त्यावरून सुमारे ३० ते ३२ हजार वाहन चालक प्रवास करीत होते. आता याची क्षमता वाढून दररोज साधारणपणे दीड लाख वाहने या रस्त्यावरून धावू शकतात. मात्र पादचाऱ्यांना मुंबईला जाणारी बस पकडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत होता. यामुळे अपघाताचा मोठा धोका होता. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पादचारी पुलाचा प्रस्ताव सहा ते सात महिन्यांपूर्वी मुख्यालयाला पाठवला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली असून टेंडर प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. ऑगस्टच्या अखेरीस पुलाच्या कामाला सुरुवात होईल. साधारणपणे तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या पुलामुळे पादचाऱ्यांची गैरसोय टळणार आहे.

पादचारी पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. याच्या टेंडर प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट अखेरीस पुलाच्या कामाला सुरुवात होईल. पूल लवकर बांधून तयार व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे.

- अंकित यादव, उप व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे