Pune Tendernama
पुणे

चांदणी चौकातील पूल पाडला पण आणखी सहा महिने...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वाहतूक कोंडीतून चांदणी चौकातून सुटका करण्यासाठी रविवारी पहाटे अखेर तो पूल पाडण्यात आला. जुन्या पुलाच्या जागीच नवा मात्र ११२ मीटर लांबीचा पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. वाहनधारकांना तत्काळ दिलासा मिळावा दोन सेवा रस्ते तयार करण्याच्या कामास वेग आला आहे. सात दिवसांत दोन सेवा रस्ते सुरु करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे.

चांदणी चौकातील हा प्रकल्प हा एकूण ३९७ कोटी रुपयांचा आहे. पैकी ८० टक्के काम पूर्ण झाले. तर उर्वरित २० टक्के काम भूसंपादनामुळे रखडले आहे. त्यामुळे वाहनधारकांना पूर्णपणे दिलासा मिळण्यास आणखी किमान सहा महिन्यांचा अवधी तर निश्चितच लागणार आहे. चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे आठ रॅम्प बाह्यवळण रस्त्याला जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याला आता वेग देण्यात येत असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सेवा रस्त्यांचे काम होईल तसे ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे.

दोन सेवा रस्ता वापरात येणार
ज्या ठिकाणी पूल होता. त्याच्या बाजूने सेवा रस्त्याच्या दोन लेन तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याला येणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा सेवा रस्ता आठ दिवसांत तयार केला जाईल. त्यासाठी कडेचे मोठे खडक देखील ब्लास्टिंग करून पाडण्यात येणार आहे. तसेच शुंगेरी मठ कडून येणाऱ्या सेवा रस्त्याचे देखील काम वेगाने सुरू आहे. हा देखील सेवा रस्ता आठ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन सेवा रस्त्यामुळे मुंबई हुन पुण्याला व पुण्याहून मुंबई ला जाणाऱ्या दोन्ही रस्त्यावर सेवा रस्ता तयार होणार आहे. परिणामी वाहन धारकाची अतिरिक्त लेन तयार होईल.त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.

काय होणार चांदणी चौकात?
तब्बल ३९७ कोटी रुपयांचा हा उड्डाणपुलाचा प्रकल्प असून, मुख्य महामार्गासह कोथरूड मुळशी, सातारा मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई असे प्रकल्प रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्यात येत आहे. या प्रत्येक मार्गाचे काम ८० टक्के काम पूर्ण झाले. तरीही वेदभवन येथील भुयारी मार्ग व मुळशी-मुंबई चा रॅम्पचे केवळ ५० मीटर चे काम शिल्लक राहिले आहे. येथील जागेचा प्रश्न न्यायालयात आहे.

नव्या पुलासाठी आणखी सहा महिने लागतील; मात्र दोन सेवा रस्ता आठ दिवसांत सुरु करणार आहोत. शिवाय जागा संपादनासाठी देखील आग्रही आहोत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यास गती मिळेल.
- संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे

आकडे बोलतात
प्रकल्पाचा खर्च - ३९७ कोटी
प्रकल्प पूर्तीचा कालावधी - मार्च २०२३
या चौकातून वाहतूक होणाऱ्या वाहनांची रोजची संख्या - सुमारे १० लाख